
रखडलेले जन्मदाखले द्यावेत, आधार कार्ड नोंदणी, मनरेगाची मजुरी यांसह विविध मागण्यांसाठी डहाणू तालुक्यातील आदिवासी बांधवांनी बुधवारपासून तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. मोर्चेकरांच्या तडाख्यामुळे तहसीलदार सुनील कोळी यांच्यासह काही अधिकारी व कर्मचारी रात्रभर कार्यालयातच अडकून पडले. दरम्यान आमच्या मागण्या मान्य करेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा आदिवासींनी घेतला आहे.
बुधवारी दुपारी तहसील कार्यालयावर जोरदार धडक देत आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले. टळटळत्या उन्हात चटके खात आदिवासी महिला व बांधव मोठ्या संख्येने या आंदोल नात सहभागी झाले होते. सरकारी योजना, मूलभूत हक्क, आवश्यक असलेली कागदपत्रे मिळवणे यांसह अनेक प्रश्न प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. २ हजार १९८ जन्मदाखले अद्यापि न मिळाल्याने येथील ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याशिवाय स्थलांतर केलेल्या १४१ कुटुंबांच्या आधार कार्डाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.
अखेर दीड हजार दाखले दिल्यानंतर माघार; अधिकारी, कर्मचाऱ्यांची सुटका
आदिवासींच्या रेट्यामुळे तहसील कार्यालयात अडकलेले अधिकारी व कर्मचारी यांनी रात्री उशिरापर्यंत जागून सुमारे दीड हजार जन्म तारखेचे व अन्य दाखले तयार केले. आज संध्याकाळच्या सुमारास हे दाखले मोर्चेकरांना दिल्यानंतर तहसीलदार सुनील कोळी व त्यांच्या सहकाऱ्यांची सुटका झाली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
बुधवारची रात्र रस्त्यावर काढली
रोहयोअंतर्गत बांबू लागवडीच्या कामाची मजुरी त्वरित मिळावी, गंजाड आणि आंबोली येथील तळघराखालील जागांच्या मालकी हक्कासाठी दाखल झालेल्या ४० अर्जाना मंजुरी द्यावी, असाही आग्रह धरण्यात आला आहे. भरउन्हात बुधवारपासून विविध मागण्यांसाठी छेडलेले आंदोलन आजही दिवसभर सुरूच होते. उन्हातान्हाची पर्वा न करता तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून ग्रामस्थ आले होते. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत तहसील कार्याल याचा परिसर सोडणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. बुधवारची रात्रही त्यांनी सर्व अडचणी सहन करत रस्त्यावरच काढली.



























































