दिव्यात बेकायदा बांधकामांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवा विभागात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे सुरू आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रत्यक्षात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या बांधकामांना अभय देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील उपजिल्हाप्रमुख अॅड. रोहिदास मुंडे यांनी केली आहे.

ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनाही निवेदन दिले असून कुणाच्याही दबावाला बळी न पडता दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असा आग्रह धरला आहे.

दिव्यातील अनधिकृत बांधकामांविरोधात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रोहिदास मुंडे हे सातत्याने विविध मार्गांनी आवाज उठवत आहेत. दिवा हे झपाट्याने वाढणारे शहर असून तेथे अनेक विकासक मोठमोठ्या टोलेजंग इमारती उभारत आहेत. मात्र त्यात हेराफेरी होत असून सहाय्यक आयुक्त व संबंधित बीट अधिकाऱ्यांना अनेकदा लेखी स्वरूपात माहिती देण्यात आली. पण त्याची दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप मुंडे यांनी आयुक्तांना पाठवलेल्या निवेदनात केला आहे.

स्वतंत्र चौकशी करा

बेकायदा बांधकामांना खतपाणी घालणाऱ्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेची स्वतंत्रपणे चौकशी करावी अशी मागणी केली आहे. शहरातील सर्व बेकायदा बांधकामांचे तातडीने सर्वेक्षण करावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दिवा शहरात बेकायदा बांधकामांचे पेव फुटले असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही कारवाई केली जात नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, असा आग्रह मुंडे यांनी धरला आहे.