
हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या सामरिक आणि संरक्षण सहकार्याला आणखी बळ देणारा ‘युद्ध अभ्यास 2026’ हा संयुक्त लष्करी सराव यंदा सप्टेंबरमध्ये हिंदुस्थानात आयोजित करण्यात येणार आहे. या सरावाचे हे 22 वे वर्ष असून प्रथमच चीनलगतची वास्तविक नियंत्रण रेषा (LAC) आणि पाकिस्तान सीमेजवळील राजस्थानमधील वाळवंटी भाग अशा दोन अत्यंत संवेदनशील क्षेत्रांमध्ये हा सराव एकाच वेळी होणार आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात होणारा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा संयुक्त लष्करी सराव मानला जात आहे. हिंद-प्रशांत क्षेत्रातील बदलत्या सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या सरावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
700 सैनिकांचा सहभाग
तीन आठवडे चालणाऱ्या या सरावात दोन्ही देशांचे सुमारे 350-350 सैनिक, म्हणजे एकूण 700 सैनिक सहभागी होणार आहेत. सरावाचा पहिला टप्पा उत्तराखंडमधील औली येथे होणार आहे. औली हे ठिकाण वास्तविक नियंत्रण रेषेपासून अवघ्या 95 किलोमीटर अंतरावर आहे.
या भागात दोन्ही देशांचे सैनिक उंच पर्वतीय भागातील युद्धतंत्राचा सराव करतील. पूर्व लडाखमध्ये चीनबरोबर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि हिमालयीन भागातील लष्करी तैनातीमधून मिळालेल्या अनुभवांचा वापर करून पर्वतीय युद्धक्षमता तपासली जाणार आहे.
राजस्थानमध्ये रणगाडे, तोफखाना आणि हवाई सराव
या सरावाचा दुसरा टप्पा राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये होणार आहे. पाकिस्तान सीमेजवळ असलेली ही रेंज हिंदुस्थानातील अत्याधुनिक लष्करी प्रशिक्षण केंद्रांपैकी एक मानली जाते.
येथे दोन्ही देशांचे सैनिक तीव्र उष्णता आणि वाळवंटी परिस्थितीत प्रत्यक्ष गोळीबार सराव, यांत्रिक लष्करी मोहिमा, तोफखाना कारवाया आणि हवाई-दल समन्वयासारख्या जटिल मोहिमांचा सराव करतील.
प्रथमच अपाचे हेलिकॉप्टरचा समावेश
‘युद्ध अभ्यास’ मालिकेच्या इतिहासात प्रथमच यंदाच्या सरावात अत्याधुनिक आणि घातक लष्करी साधनसामग्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे. त्यामध्ये AH-64 अपाचे हेलिकॉप्टर तसेच लांब पल्ल्यापर्यंत अचूक मारा करणाऱ्या आधुनिक शस्त्रास्त्रांचा समावेश असेल.
या माध्यमातून दोन्ही देशांच्या सैन्यांमधील संयुक्त लढाऊ क्षमता अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सरावादरम्यान पर्वतीय आणि वाळवंटी भागात शत्रूच्या ठिकाणांवर अचूक हल्ले, क्लोज एअर सपोर्ट मोहिमा, रणांगण समन्वय आणि तातडीच्या प्रतिसाद मोहिमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
2004 पासून सुरू असलेला सराव
हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील ‘युद्ध अभ्यास’ मालिकेची सुरुवात 2004 मध्ये झाली होती. सुरुवातीला दहशतवादविरोधी आणि बंडखोरीविरोधी कारवायांपुरता मर्यादित असलेला हा सराव आता व्यापक लष्करी प्रशिक्षण व्यासपीठात विकसित झाला आहे.
2025 मध्ये हा सराव अमेरिकेतील अलास्का राज्यातील बर्फाच्छादित प्रदेशात झाला होता. तर यंदा तो पुन्हा हिंदुस्थानातील सर्वात संवेदनशील सीमावर्ती भागात आयोजित केला जात आहे.
सामरिक भागीदारी अधिक मजबूत
सध्या या सरावामध्ये पर्वतीय युद्ध, पारंपरिक लष्करी मोहिमा, मानवीय मदत, आपत्ती व्यवस्थापन आणि संयुक्त लष्करी कारवायांसारख्या विविध बाबींचा समावेश आहे. दोन्ही देशांच्या सैन्यांमधील वाढती समन्वय क्षमता भविष्यातील सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी हिंदुस्थान आणि अमेरिका किती जवळून सहकार्य करत आहेत, याचे प्रतीक मानली जात आहे.




























































