
नवी दिल्लीत ८ जून रोजी इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत आघाडीच्या २५ पक्षांनी सहभाग घेतला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या बैठकीत आपले विचार मांडले, जे त्यांनी नंतर सोशल मीडियावरही पोस्ट केले आहेत. राहुल गांधी यांनी X वर इंडिया आघाडीच्या बैठकीत ते काय म्हणाले याचा एक ऑडिओ पोस्ट केला आहे. यात ते म्हणाले आहेत, “काँग्रेस पक्षाची भूमिका सर्वांना प्रेमाने आणि स्नेहाने एकत्र आणणे ही आहे.”
भाजप किंवा आरएसएसशी तडजोड करण्यापेक्षा काँग्रेस पक्षातच मरणे आपण पसंत करू, असे राहुल गांधी म्हणाले. ते म्हणाले, “असे करण्यासाठी तुम्हाला आमचे मुंडके कापावे लागतील. आमचे शिरच्छेद करा, पण आम्ही आरएसएससमोर झुकणार नाही, असे सांगणारे लाखो काँग्रेस कार्यकर्ते देशात आहेत.”
भाजपकडून संस्थांवर नियंत्रण आणि मतचोरीचा आरोप
राहुल गांधींनी आरोप केला आहे की, सध्याचे राजकीय मैदान निष्पक्ष राहिलेले नाही. भाजपचे देशातील न्यायव्यवस्था, नोकरशाही, गुप्तचर संस्था आणि निवडणूक आयोगावरही नियंत्रण आहे. त्यामुळे समाजवादी पक्ष, टीएमसी, आरजेडी यांसारख्या पक्षांची जुनी राजकीय साधने आता काम करणार नाहीत. ते म्हणाले की, माझे यूट्यूबवर 10 मिलियन फॉलोअर्स आहेत, पण माझे अकाउंट दाबले गेले आहे. संपूर्ण यंत्रणा, मीडिया, सोशल मीडिया, न्यायव्यवस्था, नोकरशाही या सरकारला सत्तेत टिकवून ठेवण्यासाठी एकत्र काम करत आहे.
‘आपण २०२४ ची निवडणूक हरलो नाही’
राहुल गांधींनी म्हणाले की, “आपण (इंडिया आघाडी) २०२४ ची निवडणूक हरलेलो नाही, ती आपण मागील वेळीच जिंकली आहे.” देशातील जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. परंतु, आरएसएसने देशाच्या साधनसंपत्तीवर आणि संस्थांवर ताबा मिळवला आहे. ज्यामुळे मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका जिंकणं कठीण आहे.




























































