
‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. त्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन युवा आघाडीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढून थेट मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर तीव्र निदर्शने केली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यांनी तातडीने कारवाई करत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए) बरखास्त करा या दोन प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. ‘विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱया केंद्र सरकारचा निषेध असो’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. केंद्रीय पातळीरील परीक्षांमध्ये सातत्याने होत असलेले गैरप्रकार आणि पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी दिला. परीक्षांमधील सातत्यपूर्ण गैरव्यवहार आणि पेपरफुटीचा यावेळी निषेध नोंदवण्यात आला.
एनटीए ही विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करणारी संस्था असल्याने ती तत्काळ बरखास्त करावी. तसेच परीक्षांमध्ये पारदर्शकता रहावी यासाठी ‘एनटीए’अंतर्गत घेण्यात येणाऱया परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (यूपीएससी) सोपवण्यात याव्यात, अशाही मागणीवर यावेळी जोर देण्यात यावा. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे मंत्रालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.




























































