
हिंदुस्थानी सभ्यतेत आजही लोक समाजाच्या भीतीने बलात्कारासारख्या गंभीर कृत्याचा गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे तक्रार नोंदवण्यास उशीर झाल्याचे कारण देत विनयभंगाचा गुन्हा रद्द करता येणार नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
एका मोलकरणीचा विनयभंग करणाऱ्याने हा गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. महिलेने ही तक्रार दाखल करण्यास उशीर केला. पैसे उकळण्याच्या उद्देशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला. घटना घडल्यानंतर लिफ्टमधून जाताना महिलेच्या चेहऱ्यावरील हावभाव सामान्य होते, यासह अन्य मुद्दे उपस्थित करत आरोपीने हा गुन्हा रद्द करण्याची मागणी केली.
न्या. रणजितसिंह भोसले यांच्या एकलपीठाने आरोपीचा दावा अमान्य करत ही याचिका फेटाळून लावली. आपल्याकडे आजही समाजाची भीती लोकांमध्ये आहे. या भीतीमुळेच विनयभंग, काwटुंबिक हिंसाचार व अन्य गंभीर गुह्यांची नोंद पीडित करत नाही. परिणामी तक्रार करण्यास उशीर होतोच, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
पीडितेला प्रश्नांची भीती
काय प्रश्न विचारतील याची भीती कायम पीडितेला असते. या भीतीमुळेच पीडिता तत्काळ तक्रार करण्याचे धाडस करत नाही. अशा परिस्थितीत गुन्हा नोंदवण्यास कधी-कधी उशीर होतो. उशीर होण्याची कारणे वेगवेगळी असतात. ही कारणे समजून घेणे आवश्यक असते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
काय आहे प्रकरण
या मोलकरणीचा घरमालकाने 10 मार्च 2019 रोजी विनयभंग केला. भांडण होईल या भीतीने पीडितेने पतीला घडलेला प्रकार सांगितला नाही. अखेर पतीच्या मदतीने 2 एप्रिलला पीडितेने याची तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी आरोपीने याचिका दाखल केली होती.




























































