मी द्वेषास पात्र, पण मला एक संधी द्या! स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेची जाहीर माफी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्टँडअप कॉमेडियन प्रणीत मोरे याने त्याच्या शोदरम्यान करण्यात आलेल्या अश्लील, आक्षेपार्ह व अनुचित टिप्पणी प्रकरणी जाहीर माफी मागितली आहे. हिमांशू जांगरा आणि डॉ. सेजल पवार यांनी केलेल्या विधानावरून प्रणित मोरेला ट्रोल केले जात असून त्याच्यावर कायदेशीर कारवाईही सुरू आहे. या सर्व वादावर त्याने एक व्हिडीओ जारी करत आपल्याकडून चूक झाल्याचे मान्य केले आहे.

प्रणित मोरेने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. नमस्कार, ही गोष्ट मला आधीच बोलायची होती, पण माझे इंस्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झाले होते. तुम्ही सर्वांनी माझे प्रेक्षकांशी साधलेला संवाद पाहिले असतील. त्यावरून मला सध्या मला खूप ट्रोल केले जात आहे. मला तिरस्काराचा सामना करावा लागत आहे आणि या द्वेषास मी पात्र आहे, असे प्रणित म्हणाला.

शो दरम्यान हिमांशूने अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद विधानं केली. त्यावेळी लोक हसत होती. पण हीच माझी सर्वात मोठी चूक होती. मी त्याला तिथेच थांबवू शकलो असतो. पण मी दिलेल्या व्यासपीठामुळे परिस्थिती चिघळली. लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्याबद्दल मी माफी मागतो, असे तो म्हणाला.

सध्या माझ्याविरोधात सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेत मी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करत आहे. मी फक्त एवढीच विनंती करतो की मला आणखी एक संधी दिली जावी. मी एक चांगला माणूस बनून दाखवेन, असेही तो प्रणित म्हणाला.

आरोप काय?

महाराष्ट्र सायबरने केलेल्या तपासात असे आढळून आले की, एका क्लिपमध्ये हिमांशू जांगरा यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे, तर दुसऱ्या क्लिपमध्ये डॉ. सेजल पवार यांनी मृत पुरुषांच्या देहांबाबत आणि शैक्षणिक उद्देशांसाठी वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय शवांबाबत अश्लील व अवमानकारक टिप्पणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी मोरेसह त्याच्या अन्य जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.