रशियन तेलाच्या अवैध वाहतूक प्रकरणी ब्रिटनकडून हिंदुस्थानी कॅप्टनला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जहाजावरून बेकायदेशीर रशियन तेल वाहून नेल्याप्रकरणी ब्रिटनने हिंदुस्थानी कॅप्टनला अटक केली आहे. अजय पंत असे अटक केलेल्या कॅप्टनचे नाव आहे. रशियावर लादलेल्या पाश्चात्य निर्बँधांच्या उल्लंघनाशी संबंधित ब्रिटनकडून ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या हिंदुस्थानी कॅप्टनवर रशियातून दुसऱ्या देशात प्रतिबंधित तेल आणि तेल उत्पादने वाहून नेण्यात भूमिका बजावल्याचा आरोप आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्याच्या शेवटी एक संयुक्त कारवाईदरम्यान पंत यांच्यावर कारवाई झाल्याचे सोमवारी ब्रिटनच्या नॅशनल क्राईम एजन्सीने (NCA) जाहीर केले. पंत यांच्यावर रशियाशी संबंधित निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या कारवाईत, NCA आणि ब्रिटिश सशस्त्र दलांनी इंग्लिश सामुद्रधुनीत रशियन ‘शॅडो फ्लीट’ तेल टँकर अडवला.

NCA नुसार, अजय पंत यांच्यावर रशियातून तिसऱ्या देशात, कथितरित्या जहाजाद्वारे प्रतिबंधित तेल किंवा तेल उत्पादने वाहून नेल्याचा आरोप आहे. अजय पंत यांना मंगळवारी साउथहॅम्प्टन मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात येणर आहे. एनसीएच्या (NCA) तपास अहवालाचे पुनरावलोकन केल्यानंतर क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिसने पंत यांच्यावरील आरोपांना मंजुरी दिली. जहाजावरील उर्वरित 24 कर्मचारी हे हिंदुस्थान आणि जॉर्जियाचे नागरिक असून ते जहाजावरच आहेत.

सुमारे सहा तास चाललेल्या या लष्करी मोहिमेत चिनूक, मर्लिन एमके4, वाइल्डकॅट हेलिकॉप्टर, रॉयल एअर फोर्सची (RAF) पी-8 विमाने आणि एचएमएस सदरलँड व एचएमएस लेडबरी यांसारख्या युद्धनौकांचा समावेश होता.