NEET re-exam: ‘एनटीए’कडून सुरक्षा नियमावली जारी; ॲडमिट कार्डबाबत व्हॉट्सॲपवर पाठवले अपडेट्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

२१ जून रोजी होणाऱ्या ‘नीट-यूजी २०२६’ (NEET-UG 2026) च्या फेरपरीक्षेसाठी उमेदवारांना त्यांचे ॲडमिट कार्ड (प्रवेशपत्र) डाऊनलोड करण्याचे आवाहन करणारे रिमाइंडर एसएमएस, ईमेल आणि व्हॉट्सॲप संदेश पाठवत असल्याची माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) शुक्रवारी दिली. तसेच विद्यार्थ्यांनी फसव्या आणि बनावट मेसेजेसपासून सावध राहावे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची ‘नीट-यूजी’ परीक्षा ३ मे रोजी घेण्यात आली होती, परंतु पेपरफुटीच्या आरोपांमुळे ती १२ मे रोजी रद्द करण्यात आली होती. केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआ) सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे.

‘रविवार, २१ जून २०२६ रोजी होणाऱ्या फेर परीक्षेसाठी उमेदवारांनी त्यांचे ॲडमिट कार्ड डाऊनलोड करावेत, यासाठी एनटीए उमेदवारांना रिमाइंडर एसएमएस आणि ईमेल पाठवत आहे’, असे एजन्सीने ‘एक्स’ वरील एका जाहीर निवेदनात म्हटले आहे.

एजन्सीने माहिती दिली की, अधिकृत एसएमएस हे ‘NICPEP’ या अधिकृत सेंडर आयडीवरून पाठवले जातील आणि ईमेल हे “[email protected]” वरून पाठवले जातील.

त्यांनी या प्रक्रियेसाठी http://neet.nta.nic.in ही एकच अधिकृत वेबसाईट आहे; उमेदवारांनी हा युआरएल (URL) थेट त्यांच्या इंटरनेट ब्राउझरमध्ये टाकूनच उघडावा असे सांगीतले आहे.

‘एनटीए कधीही कोणत्याही पैशांची मागणी करणार नाही, परीक्षेचे पेपर, आन्सर की किंवा ‘लीक’ झालेले साहित्य पाठवणार नाही, किंवा कोणत्याही लिंकद्वारे तुमचे ॲडमिट कार्ड शेअर करणार नाही’, असे या पत्रकात म्हटले आहे. तसेच ‘जर तुम्हाला असा कोणताही मेसेज आला, तर त्यावर क्लिक करू नका आणि त्याची तक्रार करा,’ असेही पुढे म्हटले आहे.

याशिवाय, एनटीएने नमूद केले की ते आता या फेरपरीक्षेसाठी थेट व्हॉट्सॲप (WhatsApp) द्वारे उमेदवारांना परीक्षेचे अपडेट्स आणि परीक्षा केंद्राची माहिती पाठवणार आहेत.

उमेदवारांनी मेसेज पाठवणाऱ्याच्या नावाशेजारी ‘ब्लू व्हेरीफाईड टिक’ आणि ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ हे नाव असल्याची खात्री करून घ्यावी; ‘ब्लू व्हेरीफाईड टिक’ नसलेल्या कोणत्याही अकाऊंटवरून आलेला मेसेज हा एनटीएकडून आलेला नाही, मग त्यावर त्यांचे नाव वापरलेले असले तरीही, असे या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.

एनटीएने स्पष्ट केले की, ही व्हॉट्सॲप सेवा केवळ एक ‘ब्रॉडकास्ट चॅनेल’ आहे आणि ते ‘तुम्हाला कोणताही रिप्लाय देण्यास, ओटीपी किंवा वैयक्तिक तपशील शेअर करण्यास किंवा पैसे भरण्यास सांगणार नाही’.

अशी माहिती मागणारा आणि एनटीएकडून आल्याचा दावा करणारा कोणताही मेसेज हा पूर्णपणे बनावट आणि फसवणूक करणारा आहे.

ज्या उमेदवारांनी २१ जूनच्या पुनर्रचना परीक्षेसाठी आपले ॲडमिट कार्ड आधीच डाऊनलोड केले आहे, त्यांना ते पुन्हा डाऊनलोड करण्याची गरज नाही. ‘हे एसएमएस/ईमेल/व्हॉट्सॲप मेसेजेस प्रामुख्याने अशा विद्यार्थ्यांसाठी आहेत ज्यांनी अद्याप त्यांचे नवीन ॲडमिट कार्ड डाऊनलोड केलेले नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

शिवाय, एनटीएने निदर्शनास आणून दिले की, ३ मे च्या परीक्षेसाठी जारी केलेली ॲडमिट कार्ड्स आता वैध (चालणार) नाहीत, कारण अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या मागणीनुसार शहरांमध्ये नवीन परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत.

‘२१ जूनचे ॲडमिट कार्ड एकदा डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढणे पुरेसे आहे,’ असे एनटीएने पुढे सांगितले.