‘ऑपरेशन कमळ’ करावंच लागेल! अपूर्व उत्साह, जल्लोष! घोषणा आणि टाळ्यांनी षण्मुखानंद दणाणून गेले!! उद्धव ठाकरे यांनी गद्दार खासदारांच्या मतदारसंघातील जनतेची माफी मागितली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचा साठावा वर्धापन दिन सोहळा आज मोठ्या दिमाखात आणि दणक्यात झाला. षण्मुखानंद सभागृहामध्ये निष्ठेचा सागर लोटला. या गर्दीच्या साक्षीनेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्या भाजपचा आणि खोक्यांसाठी गद्दारी करणाऱ्या खासदारांचा समाचार घेतला. ‘देश अराजकाच्या दिशेने चालला आहे. हे माझे भाकीत नाही, ही भीती आहे. हा लोकशाहीला धोका आहे. तेव्हा सगळय़ांनी मिळून आता ‘ऑपरेशन कमळ’ करावेच लागेल’, अशी गर्जना उद्धव ठाकरे यांनी केली. तरुणाईला झुरळ मानलं जातं त्या देशाचं भवितव्य काय असणार? जेन झी म्हणजेच तरुणाई पेटली तर तुमचे सरकार राहणार नाही हे लक्षात ठेवा, असा इशारा देत उद्धव ठाकरे यांनी नव्या लढ्यासाठी सज्ज होण्याचा आदेशच शिवसैनिकांना दिला. उद्धव ठाकरे यांनी यावेळी सहा गद्दार खासदारांच्या मतदारसंघांतील जनतेची जाहीर माफी मागितली.

साठावा वर्धापन दिन म्हणजे हीरकमहोत्सव असतो म्हणूनच मी म्हणेन… ‘येथे जमलेल्या हिऱ्यापेक्षा मौल्यवान, जीवाला जीव देणाऱ्या बंधू-भगिनींनो आणि मातांनो’, अशी साद घालत उद्धव ठाकरे यांनी निष्ठेने शिवसेनेसोबत भक्कमपणे उभ्या असलेल्या शिवसैनिकांपुढे नतमस्तक होत भाषणाला सुरुवात केली. ‘ही देणगी माझी वडिलोपार्जित आहे. कुणी माय का लाल ही देणगी माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही’, असे उद्धव ठाकरे उद्गारताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट आणि शिवसेनेचा जयघोष झाला. जे काही राजकारण सुरू आहे त्याने एकसुद्धा शिवसैनिक खचलेला नाही उलटा पेटलेला आहे, असे उद्धव ठाकरे कडाडले. माझ्या शब्दावर आणि बाळासाहेबांच्या विश्वासावर तुम्ही यांना निवडून दिलं होतंत असे नमूद करत ज्या सहा मतदारसंघातील शिवसेनेच्या खासदारांनी गद्दारी केली त्या मतदारसंघातील सर्व मतदारांची मी माफी मागतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेला 60 वर्षे झाली. या 60 वर्षांत शिवसेना वाढवण्यासाठी ज्यांनी रक्ताचे पाणी केले त्या सर्वांबद्दल उद्धव ठाकरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी दिवंगत नेते दत्ताजी साळवी, मनोहर जोशी, सुधीर जोशी, वामनराव महाडिक, प्रमोद नवलकर, दत्ताजी नलावडे यांचा उल्लेख केला. त्यांच्या कष्टांमुळेच आज शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसतेय, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र भाजपच आता मिंधेसेनेत विलीन होईल

शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होत असल्याचा आरोप करत भाजपने शिवसेनेचे सहा खासदार फोडले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधला. ‘तीस वर्षे भाजपसोबत राहून आम्ही भाजपमध्ये विलीन झालो नाही, तर काँग्रेसमध्ये काय विलीन होणार? उलट महाराष्ट्र भाजपच आता ‘मिंधेसेनेत’ विलीन होईल अशी भीती वाटतेय,’ अशा जळजळीत शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱयांना ठणकावून सांगितले.

रक्तात भेसळ असलेली ही अवलाद कुणाची?

‘मातोश्री’ आणि ठाकरे कुटुंबीयांवर होणाऱ्या आरोपांबद्दलही उद्धव ठाकरे यांनी यावेळी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, ज्या शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाच्या, हिंदूंच्या रक्तात स्वाभिमान भिनवला, तिथे ही भेसळ कुठून आली, ही अवलाद कुणाची, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारताच, दोन बापांची असा आवाज गर्दीतून आला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ते तर कळतेय, दुसऱयाचे बाप चोरावे लागताहेत. त्यावर पुन्हा हशा पिकला. ‘मातोश्री’वर व ठाकरे कुटुंबीयांवर जळताहेत त्यांना ठाकरे कुटुंबीयांनी महाराष्ट्रासाठी काय काय भोगलेय त्याची कल्पना तरी आहे का, असा सवालही त्यांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळीही गद्दार होते. शाहू, फुले, आंबेडकर या सर्वांना त्रास झाला. जोतिबा फुले आणि सावित्रीबाईंवरही शेणमार, धोंडमार झाली. जुन्या रूढी-परंपरा तोडून मोडून टाकण्यासाठी उभे राहिल्याने प्रबोधनकारांना कर्मठ व बामणी वृत्तीने त्रास दिला. शिवसेनाप्रमुखांनीही टीका सहन केली. आज माझ्यावर व माझ्या कुटुंबावर आरोप होताहेत. मुख्यमंत्रीपद मला स्वीकारावे लागले त्यावेळी म्हणून आरोप केले जात आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी गद्दारांचा समाचार घेतला.

बंगालमध्ये सुरक्षा दल घुसवता तर पाकव्याप्त कश्मीरमध्ये का नाही?

‘सरदार वल्लभभाई पटेलांनी देशात प्रांत आणण्यासाठी रझाकारांवर पोलीस कारवाई केली होती. पण भाजपने बंगालमध्ये एका महिलेला हरवण्यासाठी दोन-अडीच लाख पोलीस घुसवले. पक्ष फोडायला तुम्ही देशाचे सुरक्षा दल वापरता? हेच बळ मणिपूर किंवा पाकव्याप्त कश्मीरमध्ये का घुसवले नाही? चला उद्या घुसवा…शिवसेना जाहीर पाठिंबा देते, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.

वन नेशन वन इलेक्शन म्हणाले होते. परंतु भाजपची वाटचाल वन पार्टी नो इलेक्शनकडे चालली आहे, असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. एकच पक्ष राहील दुसरा राहताच कामा नये या दिशेने भाजपा चालली आहे पण या वाटेने जाल तर दीर्घकाळ सत्ता लाभणार नाही असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला.

झुरळ बोलताय त्या तरुणांनीच देशाला स्वातंत्र्य दिले

ज्यांना आपण देशाचे भाग्यविधाते म्हणतो त्या तरुणांना भाजप झुरळ म्हणतेय. त्या भाजपने हे लक्षात घ्यावे की देशाला स्वातंत्र्य निवडणुका जिंकून नाही तर त्या वयातील मुलांनी केलेल्या क्रांतीमुळे मिळाले आहे, असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी, खुदीराम बोस, अनंत कान्हेरे, चापेकर बंधू आणि जेन-झी यांची उदाहरणे यावेळी दिली. मेलो तरी बेहत्तर पण मी माझ्या देशाला स्वतंत्र करेन या विचारांनी त्यांनी बलिदान दिले, असे ते म्हणाले.

मग भाजपवाले काय करतील

असा विचार करूया की याच्यापुढे शिवसेना निवडणूकच लढवणार नाही, मग भाजपवाले काय करतील, तुमच्यापैकी किती माझ्यासोबत राहतील, या प्रश्नावर सभागृहातील सर्वांनी आम्ही शिवसेनेसोबत राहू असे उत्तर दिले. एकालाही तिकीट मिळणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच, आम्हाला नको असा आवाज घुमला. मरमर मेहनत तुम्ही करायची, निवडून आपण आणायचे आणि यांचे खोक्यावर खोके सुरू आहेत.

सहा खासदारांच्या निर्णयाने पक्षाचे विलीनीकरण होत नाही

उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या खासदारांच्या कायदेशीर वैधतेवर यावेळी घटनातज्ञ उल्हास बापट यांची ऑडिओ क्लिप ऐकवली. ‘दहाव्या अनुसूचीनुसार स्वतःहून पक्ष सोडणारा अपात्र ठरतो. केवळ 6 लोकांच्या मतानुसार पक्षाचे विलीनीकरण होत नाही, त्यासाठी पक्षप्रमुखाचा निर्णय अंतिम असतो,’ असे बापट यांनी त्या क्लिपमध्ये स्पष्ट केले आहे.

खंडोजीला गद्दार म्हणणारा गद्दार झाला

बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांचा नामोल्लेख न करता उद्धव ठाकरे यांनी यावेळी त्यांचा समाचार घेतला. खंडोजी खोपडे आणि सुर्याजी पिसाळ यांची नावे घेतल्यानंतर काय आठवते असे निवडणुकीत प्रचारावेळी निंबाळकरांनी मतदारांना विचारले होते, त्यावर मतदारांनी गद्दार असे उत्तर दिले होते. आता तेच निंबाळकर गद्दार झाले असे उद्धव ठाकरे म्हणाले. निंबाळकरांच्या प्रचारसभेत एक शेतकरी बटवा घेऊन आला होता. समोर हरामाच्या पैशांचा पाऊस पडत असतानाही शेतकऱयांच्या त्या मदतीवर निंबाळकर जिंकून आले होते, त्यांनीच आता त्यांचा विश्वासघात केला, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मातोश्रीने फक्त वाढायचे, जेवायचे काम ‘ते’ करणार

मातोश्रीवर टीका करणाऱया एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी खडेबोल सुनावले. ते म्हणाले की, ‘मातोश्रीने फक्त वाढायचे काम करायचे. जेवायचे काम ते करणार. सर्व काही मलाच पाहिजे. मीच मुख्यमंत्री होणार. माझं कार्टच खासदार होणार, मंत्री होणार. मातोश्रीने फक्त भोगायचे. मातोश्रीला अधिकार नाही.शिवसेनेच्या आजवरच्या वाटचालीत अनेक संकटे आली. खासदारांच्या गद्दारीचे संकट त्यासमोर काहीच नाही. ज्यावेळी आपल्या यश-अपयशाची तुलना निवडणुकीच्या निकालाशी करायला लागलो त्यावेळी आपण फसलो, अशी खंतही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

मी कुणाला भेटत नव्हतो तर गधडे निवडून कसे आले?

उद्धव ठाकरे कुणाला भेटत नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते प्रचारासाठी बाहेर पडले नाहीत असा आरोप बंडखोर खासदारांनी केला. त्यालाही उद्धव ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, स्थानिकच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने स्थानिक नेत्यांवर जबाबदारी सोपवली होती. लोकसभा निवडणुकीत मात्र मी स्वतः 6 ते 10 सभा घेतल्या. मोदींचा चेहरा नसतानाही शिवसेनेचे 9 खासदार डौलाने निवडून आले होते. मी कुणाला भेटत नव्हतो तर हे गधडे निवडून कसे आले, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित करताच सभागृहात हशा पिकला. मी कुणाला तिकीट दिले, आमदार केले, खासदार व मंत्री केले असे म्हटले, तिथली खुर्ची दाखवली तर तो माझा गर्व ठरेल. कारण उद्धव ठाकरे या नावाला किंमत नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाला किंमत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शहरात बेसुमार जंगलतोड सुरू आहे. शहरात फक्त वडापाव माहीत आहे, पण वटसावित्रीचा वटही गेला, त्याभोवती फेऱ्या मारणेही गेले. वडाला पारंब्या असतात, एखाद्याने लांबून नमस्कार केला तर त्या पारंबीला वाटते मला नमस्कार केला, पण त्या पारंबीला नाही तर खोडाला नमस्कार केला जातो, असा दाखलाही उद्धव ठाकरे यांनी दिला.

प्रबोधनकारांना विरोध करणारी गोमूत्रधारी प्रवृत्ती पुन्हा बोकाळली आहे. भाजपचे हिंदुत्व हे हिंदुत्व नाही, भोंदुत्व आहे. शिवसेनेचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही, शिवसेनेचे हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे. भगवा हा छत्रपतींचा, हिंदूंचा, वारकऱयांचा, महाराष्ट्र धर्माचा भगवा आहे. त्या भगव्यामध्ये जो भेद करतो तो अस्सल हिंदू असूच शकत नाही. त्याच्या शरीरामध्ये भेसळयुक्त रक्त आहे.

निवडणुकीआधी लाडकी बहीण म्हणत मते मागितली आणि निवडणुका झाल्यानंतर 80 लाख बहिणींची ओवाळणी काढून घेतली. काय तर्रेबाजी करत होते. दाढीवर हात फिरवत होते. मिळाले की नाही, मिळाले की नाही…असे सांगत मिरवत होते. मग आता काय झालं?

लॉजिस्टिक प्रशिक्षणातील गुणवंतांना प्रमाणपत्र

शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त लॉजिस्टिक क्षेत्रात मराठी तरुणांना रोजगाराचे नवे दालन उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना भवन येथे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. दोन महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना बडय़ा कंपन्यांत ट्रेनिंग देण्यात आले असून लॉजिस्टिकमध्ये काम करणाऱया दिग्गज मंडळींनी या मुलांना प्रशिक्षणासोबतच त्यांच्या कंपनीत नोकरीची संधीदेखील दिली आहे.

निष्ठावंत खासदारांच्या पाठीवर कौतुकाची थाप

कितीही संकटे आली तरी शिवसेनेची साथ न सोडणारे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई आणि शिवसेना खासदार राजाभाऊ वाजे या निष्ठावंत खासदारांचा यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

काँग्रेसने कधी ‘मातोश्री’वर डोळे वटारले नाहीत

आणीबाणीच्या काळात रजनी पटेल शिवसेनेच्या मुळावर उठले होते. त्यांनी शिवसेनाप्रमुखांना एक पत्र देऊन त्यावर सही करण्यास सांगितले होते नाहीतर तुरुंगात टाकतो अशी धमकी दिली होती. शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. बाळासाहेबांनी ते पत्र फेकून दिले होते आणि मला हात लावशील तेव्हा तुझी तिरडी उठलेली असेल असा इशारा पटेल यांना दिला होता, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना कधीही कुणात विलीन होत नसते. काँग्रेससोबत शिवसेनेचे टोकाचे वैर होते, पण काँग्रेसने कधी ‘मातोश्री’वर डोळे वटारले नाहीत. भाजपने मात्र शिवसेनेला मुळासकट उपटून काढण्याचा प्रयत्न केला, असा टोला भाजपला लगावतानाच, भाजपचे निष्ठावान नेते आता दिल्लीच्या आदेशामुळे मिंधेंची दाढी खाजवत आहेत, अशी खिल्लीही त्यांनी उडवली.

भाजपने विचारांच्या वांझोटेपणावर उपचार करावेत

भाजपकडे संसदेत दोन तृतीयांश बहुमत नाही, पण भाजपमध्ये जेवढे खासदार आहेत ते सर्व काँग्रेस व इतर पक्षांचे बाहेरचे आहेत. भाजपला राजकारणात पोरं होत नाहीत म्हणून आमची पोरं का पळवताहेत. भाजपमध्ये विचारांचे वांझोटेपण आहे, त्यांनी स्वतःच्या विचारांच्या वांझोटेपणावर उपचार करावेत, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. भाजपची पोरं पळवणारी टोळी असली तरी शिवसेनेची पोरं पुरवणारी टोळी नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

फोडाफोडी का करताय. काय मिळावयचेय भाजपला. सत्तापिपासू किती व्हायचे. तोडून फोडून भामटेगिरी का करता. बोलवा ना आम्हाला. आम्ही काही पाकिस्तानातून आलेलो नाही. आम्हीही देशभक्त आहोत आणि भाजपपेक्षा काकणभर जास्तच आहोत.

शिवसेनेच्या हीरक महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी माहीम विधानसभा निरीक्षक यशवंत विचले, उपविभागप्रमुख सिद्धार्थ चव्हाण, माजी शाखाप्रमुख प्रवीण शेटये, शिवसैनिक प्रभाकर शिरोडकर, राजन चौगुले, विशाल चाफे उपस्थित होते.

सभागृहात तुडुंब गर्दी

वर्धापन दिन सोहळ्यात गद्दारांविरुद्ध प्रचंड चीड दिसून आली. निष्ठावंत शिवसैनिकांचे जथेच्या जथे दुपारपासूनच षण्मुखानंद सभागृहात येत होते. बाहेर भली मोठी रांग लागली होती. हातात भगवा झेंडा आणि शिवसेनेचा अखंड जयघोष सुरू होता. कोणी कुठेही गेला तरी लाखो शिवसैनिक ठाकरेंसोबत एकनिष्ठ आहेत, असा निर्धार व्यक्त होत होता. संपूर्ण सभागृह गर्दीने खच्चून भरले होते आणि सभागृहाच्या बाहेरही गर्दी होती. तिथे मोठय़ा स्क्रीनवर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकले.

शिवसेना सत्तेसाठी नाही, सत्ता शिवसेनेसाठी!

शिवसेना कधीच सत्तेसाठी जन्माला आलेली नाही या शिवसेनाप्रमुखांच्या विधानाची आठवण यावेळी उद्धव ठाकरे यांनी करून दिली. राज्यात शिवसेनेचे सरकार असताना तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री इंद्रजीत गुप्त एका घटनेवरून शिवसेनाप्रमुखांना भेटायला आले होते. त्यांनी कारवाईचा इशारा दिला होता. त्यावर, काय कराल, सरकार बरखास्त कराल ना, शिवसेना सत्तेसाठी जन्माला आलेली नाही, सत्ता शिवसेनेसाठी जन्माला आली आहे, असे बाळासाहेबांनी ठणकावून सांगितले होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांची भावनिक साद आणि शिवसैनिकांचा एकमुखी प्रतिसाद

उद्धव ठाकरे यांच्या मनात गद्दारी आणि फोडाफोडीच्या राजकारणावरून प्रचंड चीड होती. ती चीड शिवसैनिकांपुढे मांडताना उद्धव ठाकरे भावुक झाले. त्यांनी थेट नेतृत्वावरून शिवसैनिकांना प्रश्न केला… मी गेली बारा-तेरा वर्षे पक्षाचे नेतृत्व सांभाळतोय; पण आज जे आरोप माझ्यावर होताहेत ते तुम्हाला खरे वाटत असतील तर सांगा… मी आत्ता या पदावरून पायउतार व्हायला तयार आहे. फक्त एकच अट आहे… ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या, दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही, असे उद्धव ठाकरे म्हणताच सभागृह उभं राहिलं. नाही… नाही… असे म्हणत शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा जयजयकार केला. तेव्हा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले… ‘तुमच्यापैकी कोणीही एक शिवसैनिक येऊ द्या… तो शिवसेना पक्षप्रमुख बनेल. मला त्याचे कौतुक वाटेल. मला नेतृत्वाचा सोस नाही. नेतृत्वाची हाव नाही… पण कुणी लाचार, गद्दार, भेसळयुक्त रक्ताचा माणूस माझ्यावरती आरोप करत असेल तर ते चालणार नाही. त्याला तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. मी डगमगलेलो नाही… मी खचणारा नाही. अनेक संकटे आली, अनेक वादळे आली… मी पळणारा नाही, मी पहाडासारखा उभा राहीन. जबाबदारी स्वीकारेन; पण तुमच्या मनात जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंत आणि तोपर्यंतच मी नेतृत्व करेन… आणि ज्या क्षणी तुम्हाला वाटेल त्याक्षणी मी हे पद सोडल्याशिवाय राहणार नाही.’