हरियाणातून आणलेल्या मुलीला भाईंदरमध्ये विकले; गँगरेपही केला, 8 जणांना बेड्या, चांगल्या शिक्षणाचे आमिष दाखवून अत्याचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

चांगल्या शिक्षणाचे आमिष दाखवत एका अल्पवयीन मुलीला भाईंदरमध्ये आणून तिला विकले. त्यानंतर तिच्यावर गँगरेप केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आठजणांना बेड्या घातल्या आहेत. विशेष म्हणजे तक्रारदारच आरोपी निघाला असून या कटात त्याच्या पत्नीचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. तिच्यासह सर्व आरोपींना अटक केली असून नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाईंदर येथे राहणाऱ्या संजय गुप्ता व त्याची पत्नी मधु गुप्ता यांनी हरियाणाच्या अंबाला गावात राहणाऱ्या एका मुलीला तुला चांगल्या शाळेत शिकवतो असे आश्वासन दिले. तुझी आम्ही चांगली काळजी घेऊ असे सांगून गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीला भाईंदरमध्ये आणले. तिला आता आपल्याला चांगले शिक्षण मिळेल असे वाटले होते. पण प्रत्यक्षात तिची विक्री करण्यात आली. त्यानंतर तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिच्यावर गँगरेप करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. आश्चर्य म्हणजे तिला हरियाणामधून आणलेल्या संजय गुप्ता याने पोलीस ठाणे गाठून मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार केली.

तक्रारदारच आरोपी

पोलिसांना संशय आल्याने त्यांनी संजय गुप्ता व त्याची पत्नी मधु गुप्ता या दोघांच्या मुसक्या आवळल्या. पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल केला आहे. या प्रकरणाची कसून चौकशी केली असता त्या मुलीवर गँगरेप झाला असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी गुप्ता दाम्पत्यासह सीमा वर्मा, सुनील शर्मा, राकेश मारवाडी उर्फ राकेश रोटांगण, सविलयप्रसाद श्रीवास्तव उर्फ एलआयसीवाला, कुत्तबुद्दीन अब्दुल हमीद खान उर्फ राजू, रामचंद्र भोईर यांना अटक केली आहे. या प्रकरणात तक्रारदारच आरोपी निघाल्याने पोलीस अधिक सखोल तपास करत आहेत.