Ratnagiri News – गणपतीपुळ्यात पाच जण बुडाले; एकाचा मृतदेह सापडला, चौघांचा शोध सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती संभाजीनगर येथून १९ जणांचा एक समूह पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आला होता. शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पाच जण पोहण्यासाठी गणपतीपुळे समुद्रात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने पाच जण बुडाले. बुडालेल्या पाच जणांचा शोध सुरू असताना एकाचा मृतदेह सापडला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथून १९ जणांचा एक समूह गणपतीपुळे येथे शुक्रवारी १९ जून रोजी रात्रीच्या सुमारास दाखल झाला होता. हा समूह देवदर्शन व पर्यटनासाठी खाजगी वाहनाने आला होता. या ग्रुपने 19 जून रोजी रात्रीच्या सुमारास गणपतीपुळे येथे एका खाजगी लॉजिंग वर मुक्काम केल्यानंतर शनिवारी सकाळी गणपती मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यातील पाच जण समुद्राच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरले. उर्वरित १४ जण समुद्रकिनाऱ्यावर थांबले होते. मात्र, समुद्रात अंघोळीसाठी उतरलेले पाच जण पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्राच्या पाण्यात ओढले गेले आणि बुडाले.

​पर्यटक बुडत असल्याचे लक्षात येताच किनाऱ्यावरील स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि तैनात असलेल्या जीवरक्षकांनी तातडीने समुद्रात धाव घेतली. त्यांनी बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. पण त्यात यश आले नाही. समुद्राला उधाण असल्याने बचाव कार्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस आणि जीवरक्षक, स्थानिक व्यावसायिक शर्थीचे प्रयत्न करत आहेत. समुद्रात बुडालेल्या पाच जणांमध्ये आदित्य संतोष राऊत (वय वर्षे २२), अनिकेत बंडू हिवराळे (वय वर्षे २०),आनंद राजू नरवडे (वय वर्ष २०),प्रेम दीपक आदमाने (वय वर्षे १९), यश रामेश्वर कांबळे (वर्षे १९, सर्व राहणार बीडकिंन, जिल्हा संभाजीनगर ,तालुका पैठण) यांचा समावेश आहे. स्थानिक प्रशासन, पोलीस, जीवरक्षक तटरक्षक दल आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीने बोटींच्या सहाय्याने बुडालेल्या बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू आहे. सायंकाळी बुडालेल्यांपैकी प्रेम आदमाने याचा मृतदेह सापडला.अन्य बुडालेल्या चौघांचा शोध सुरू आहे.

गणपतीपुळे येथे समुद्रात पाच जण बुडाल्याची माहिती मिळताच रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे आदींनी गणपतीपुळे समुद्रकिनारी भेट देऊन झालेल्या घटनेची माहिती घेऊन समुद्रकिनारी असलेल्या पर्यटकांना समुद्राच्या खोल पाण्यात जाऊ नये असे आवाहन केले.