
हाँगकाँग येथे पार पडलेल्या ७ व्या आशियाई ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्याचा अवघ्या १३ वर्षांचा जिम्नॅस्ट नकुल भावेश कारेकर याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत नकुलने अंतिम फेरीत धडक मारत सहावा क्रमांक पटकावला. त्याच्या या घवघवीत यशामुळे दापोली तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे.
दापोली तालुक्यातील मूळ मांदिवली गावचा रहिवासी असलेल्या नकुलने आपल्या नेत्रदीपक आणि कौशल्यपूर्ण कामगिरीने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या गावासह तालुका, जिल्हा, राज्य आणि देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील तगड्या स्पर्धकांसमोर त्याने दाखवलेले कौशल्य आणि जिद्द क्रीडा जगताचे लक्ष वेधून घेणारी ठरली. आशियाई स्पर्धेत देशाचा झेंडा फडकवल्यानंतर, नकुलने आता आगामी ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप’ स्पर्धेसाठी आपली तयारी सुरू केली आहे. भविष्यातही तो आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव आणखी उंचावेल, असा ठाम विश्वास त्याच्या प्रशिक्षकांनी आणि क्रीडा क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
नकुलच्या या ऐतिहासिक यशामुळे दापोली तसेच ग्रामीण भागातील अनेक युवा खेळाडूंना नवीन प्रेरणा मिळाली आहे. योग्य संधी, सातत्यपूर्ण सराव आणि योग्य सुविधा मिळाल्यास ग्रामीण महाराष्ट्रातूनही आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडू शकतात, हेच नकुलने आपल्या कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे. दरम्यान, नकुलच्या या सातत्यपूर्ण आणि कौतुकास्पद कामगिरीबद्दल दापोली आणि मंडणगड तालुक्यातील क्रीडा मंडळे, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी तसेच क्रीडाप्रेमींकडून त्याच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.































































