पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला; दोन आयईडी स्फोटात ७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यांचे सत्र पाहायला मिळत आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्यात सलग दोन आयईडी बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या भीषण हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या लागोपाठ झालेल्या स्फोटांमुळे संपूर्ण पाकिस्तान हादरून गेला आहे. एबीपी न्यूजने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

स्थानिक माध्यमांतील वृत्तानुसार, खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या बन्नू भागात दहशतवाद्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी आयईडी स्फोट घडवून आणले. या स्फोटांची तीव्रता मोठी होती. यात आतापर्यंत ७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेक जण या स्फोटांच्या विळख्यात अडकून जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या नागरिकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्फोटाची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, बचाव पथके आणि सुरक्षा दलांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा दिला असून, हा भाग सील करण्यात आला आहे. या स्फोटांमागे नेमक्या कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांकडून परिसरात व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात आली असल्याचे स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले आहे.