जीटीबी नगरच्या पंजाबी कॅम्पमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा; शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शीव कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातील गुरुतेग बहादूर नगर पंजाबी कॅम्प येथील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा मार्ग शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे मोकळा झाला आहे. आज म्हाडा कार्यालयात झालेल्या विशेष बैठकीत या प्रकल्पाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

म्हाडा कार्यलयात पार पडलेल्या बैठकीत शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांनी पंजाबी कॅम्पमधील सदनिका, दुकानदार आणि झोपडपट्टी धारकांच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या. या बैठकीदरम्यान 1 हजार 200 सदनिकाधारक, 356 झोपडपट्टी व दुकानधारकांच्या पुनर्वसनाबाबत यशस्वी तोडगा काढण्यात आला. शीव कोळीवाडा विधानसभा संघटक गजानन पद्माकर पाटील, शिव वाहतूक सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष हन्नी कोचर आणि उपशाखाप्रमुख प्रेम कनोजिया यांच्या पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले आहे.

या विषयांवर यशस्वी चर्चा

सर्व सदनिकाधारक, झोपडपट्टीधारक आणि दुकानधारकांसोबत डीम्ड अॅग्रीमेंटकरण्यात येणार असून 15 जुलैपर्यंत भाडय़ाची रक्कम अदा करण्यात येणार आहे. तसेच झोपडपट्टीधारकांची नावे अंतिम अनेक्शर-2’ यादीत समाविष्ट करून लवकर त्यांचे सर्वेक्षण पूर्ण केले जाणार आहे. या पुनर्वसन प्रकल्पांतर्गत मंजूर क्षेत्रफळानुसारच लाभार्थ्यांना घरे आणि दुकाने देण्यात येतील, असे आश्वासन यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिले.