
स्मार्ट मीटरची सक्ती, वाढीव वीज बिले आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याविरोधात डहाणूंकरांच्या संतापाचा स्फोट झाला. महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली हजारो डहाणूंकरांनी महावितरण कार्यालयावर धडक देत ताळे ठोको आंदोलन केले. स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय तातडीने रद्द करा अन्यथा पळता भुई थोडी करू, असा इशारा यावेळी डहाणूकरानी दिला.
महावितरणने ग्राहकांना विश्वासात न घेताच स्मार्ट मीटर बसवण्याचा सपाटा लावला आहे. हे स्मार्ट मीटर कुणाच्या फायद्याचे आहेत, असा सवाल करत आज हजारो नागरिक, कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेतृत्वाखाली मोर्चा महावितरण कार्यालयावर धडकल्या. पालघर जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय तात्काळ रद्द करा. ज्या ठिकाणी जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवले आहेत ते काढून पुन्हा जुने मीटर बसवा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.
यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले, चंद्रकांत घोरखना, रडका कलांगडे, लहानी दवडा, किरण गहला, कमलेश राबड, सुरेश जाधव, राजेश दळवी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संजय पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सत्यम ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मिहीर शहा, तन्मय बारी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्च्यात सहभागी झाले होते.
स्मार्ट मीटर काढून महावितरणकडे जमा
यावेळी डहाणू तालुक्यातील ग्राहकांनी महावितरणने बसवलेले दोनशेहून अधिक स्मार्ट मीटर काढून आणले आणि ते महावितरण कार्यालयात जमा केले. स्मार्ट मीटरमुळे आलेल्या वाढीव वीज बिलांचा मानसिक व आर्थिक त्रास भोगावा लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.


























































