
जगभरात लोकप्रिय असलेला बॉलिवूडचा ‘किंग खान’ शाहरुख खान हा एकेकाळी दिल्लीतील नाट्यवर्तुळात समोसे पोहोचवणारा चुणचुणीत मुलगा होता. ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर यांनी नुकत्याच एका मुलाखतीत हा रंजक किस्सा सांगितला. किंडल कास्टच्या यूट्यूब चॅनलवरील संवादादरम्यान पंकज कपूर यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मधील त्यांच्या विद्यार्थीदशेच्या आठवणींना उजाळा दिला. एनएसडीमधून पदवी घेतल्यानंतर 50 वर्षांनी झालेल्या वर्गमित्रांच्या स्नेहसंमेलनात अनेक जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या, असे त्यांनी सांगितले.
पंकज कपूर यांनी प्रसिद्ध रंगकर्मी इब्राहिम अल्काझी यांच्या ‘रझिया सुलतान’, ‘तुघलक’ आणि ‘अंधा युग’ या नाटकांच्या प्रयोगांचा उल्लेख केला. जुन्या किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सादर होणाऱ्या या नाटकांमध्ये विद्यार्थ्यांना छोट्या-मोठ्या भूमिका मिळत असत. ‘रझिया सुलतान’मधील एका दृश्याची आठवण सांगताना पंकज कपूर म्हणाले की, त्या दृश्यात भुकेलेल्या नागरिकांची गर्दी दाखवली जात होती. सैनिकांच्या भूमिकेत असलेले विद्यार्थी गर्दीकडे नान फेकत असत. त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी एक भन्नाट युक्ती शोधली होती. ते नान गोळा करून मध्यंतरात समोसे आणि चहासोबत त्याचा आस्वाद घेत असत. मात्र या गोष्टीतील सर्वात खास भाग म्हणजे त्या समोसांचा पुरवठा करणारी व्यक्ती. पंकज कपूर हसत म्हणाले, “आम्हाला समोसे आणून देणारा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून शाहरुख खान होता. तेव्हा तो सुमारे दहा वर्षांचा होता आणि त्याचे वडील एनएसडीची कॅन्टीन चालवत होते.” असे वृत्त आज तक ने दिले आहे.
विशेष म्हणजे, 2016 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुख खान यांनीही त्यांच्या वडिलांनी एनएसडीमध्ये कॅन्टीन चालवली असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांना अनेक दिग्गज रंगकर्मी आणि कलाकारांच्या सहवासात राहण्याची संधी मिळाली. याच वातावरणातून त्यांनी अभिनयाचे अनेक बारकावे शिकल्याचे शाहरुख यांनी नमूद केले होते. सध्याच्या घडीला बॉलिवूडमध्ये सर्वोच्च स्थान मिळवलेल्या शाहरुख खानच्या संघर्षमय आणि साध्या सुरुवातीचा हा किस्सा चाहत्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे.


























































