लोहगड ट्रेकर मृत्यू प्रकरण – तो पडला नाही, तर त्याला ढकललं… होणाऱ्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने केतनचा काटा काढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंग दरम्यान झालेल्या केतन विशाल अग्रवाल या 26 वर्षीय तरुणाच्या मृत्यू प्रकरणाला आता एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक कलाटणी मिळाली आहे. सुरुवातीला फोटो किंवा सेल्फी काढताना तोल जाऊन झालेला अपघात वाटणारी ही घटना प्रत्यक्षात एक पूर्वनियोजित घातपात असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. केतनच्या होणाऱ्या पत्नीनेच तिच्या प्रियकराच्या मदतीने त्याला 400 फूट खोल दरीत ढकलून दिल्याचा खळबळजनक खुलासा झाला असून, याप्रकरणी पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

रिअल इस्टेट व्यवसायात संचालक असलेला केतन अग्रवाल 18 जून रोजी मावळ तालुक्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेला होता. त्याच्या होणाऱ्या पत्नीचा आगामी वाढदिवस साजरा करण्यासाठी या ट्रिपचे आयोजन करण्यात आले होते. त्या दिवशी सकाळी किल्ल्यावर असताना जोरदार वाऱ्यामुळे फोटो काढताना केतनचा तोल गेला आणि तो दरीत कोसळला, असा बनाव त्याच्या होणाऱ्या पत्नीने रचला होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरुवातीला केवळ आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल आणि तांत्रिक तपास केला असता, हा संपूर्ण प्रकार एक रचलेला कट असल्याचे समोर आले. केतनच्या होणाऱ्या पत्नीने तिच्या प्रियकरासोबत संगनमत करून केतनला जाणीवपूर्वक दरीत ढकलले आणि त्याला अपघाताचे रूप देण्याचा प्रयत्न केला.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केतनचा विवाह येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार होता. या भव्य विवाहासाठी दोन्ही कुटुंबांनी राजस्थानमधील उदयपूर येथे एक आलिशान पॅलेस देखील बुक केला होता. मात्र, त्यापूर्वीच हा थरार घडला. पोलिसांनी आता या घटनेचा थेट हत्या म्हणून तपास सुरू केला असून संशयित आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेला आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेला लोहगड किल्ला या धक्कादायक गुन्ह्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.