
जनशक्ती जनता दलाचे अध्यक्ष तेज प्रताप यादव यांच्या शासकीय निवासस्थानी चोरी झाली आहे. या चोरीमधून सुमारे 20 लाख रुपये रोख रक्कम आणि अनेक मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या आहेत. या चोरीसंदर्भात त्यांनी त्यांचे वैयक्तिक सहाय्यक (पीए) मोतीलाल राय यांच्याविरोधात पाटणा येथील सचिवालय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, 22 जून रोजी कपाटाची तपासणी करताना ही बाब उघडकीस आली. कपाटातून सुमारे 20 लाख रुपये रोख, दोन तोळ्यांची सोन्याची साखळी, सोन्याची अंगठी, चार नवीन ड्रोन, दोन हार्ड डिस्क, एक आयपॅड, एक मॅकबुक, एक लेनोवो लॅपटॉप आणि चार आयफोन 17 प्रो मॅक्स मोबाईल फोन गायब असल्याचे आढळून आले.
तेज प्रताप यादव यांनी दावा केला आहे की, चोरीला गेलेली 20 लाख रुपयांची रक्कम ही पक्षाचा निधी होती. त्यांनी आपल्या तक्रारीत मोतीलाल राय यांच्यावरच चोरीचा संशय व्यक्त केला आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, घटनेच्या रात्री सुमारे 11.30 वाजता दोन व्यक्तींनी मोतीलाल राय यांना एक बॅग घेऊन निवासी संकुलातून बाहेर पडताना पाहिले होते. तेज प्रताप यादव यांनी या दोघांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे तपास सुरू केला असून, अर्जातील आरोपांची पडताळणी केली जात आहे. उपलब्ध पुरावे आणि चौकशीच्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. असे वृत्त आज तक ने दिले आहे.
दरम्यान, मोतीलाल राय यांच्यावरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नसून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तेज प्रताप यादव यांनी चोरीला गेलेली रक्कम आणि मालमत्ता जप्त करून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.























































