George Kurian – राज्यसभेची उमेदवारी नाकारली; भाजप नेते जॉर्ज कुरियन यांचा केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय अल्पसंख्याक कल्याण राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंगळवारी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यसभेचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली होती.

जॉर्ज कुरियन यांच्याकडे अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयासोबतच केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाचे राज्यमंत्रीपदही होते. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जॉर्ज कुरियन यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचे राष्ट्रपती भवनातून मंगळवारी जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी हा राजीनामा त्वरित प्रभावाने मंजूर केला आहे.

पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी संविधानाच्या कलम 75 च्या उपकलम (2) अंतर्गत जॉर्ज कुरियन यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील राजीनामा तातडीने स्वीकारला आहे, असे राष्ट्रपती भवनाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील एकमेव ख्रिश्चन सदस्य मानले जाणारे जॉर्ज कुरियन यांचा राज्यसभेचा कार्यकाळ 21 जून रोजी संपला. 18 जून रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपने कुरियन यांच्यासह केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांना पुन्हा उमेदवारी दिली नव्हती. कार्यकाळ संपत आलेला असतानाही पक्षाने त्यांना डावलल्यामुळे अखेर कुरियन यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला.

कोण आहेत जॉर्ज कुरियन?

  • जॉर्ज कुरियन (65) हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून 1980 मध्ये पक्षाच्या स्थापनेपासून ते भाजपशी जोडलेले आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून प्रॅक्टिस केली असून, नंतर त्यांनी राज्यसभा खासदार म्हणून कार्यभार सांभाळला. त्यांनी केरळ विधानसभेच्या अनेक निवडणुकाही लढवल्या आहेत.
  • केंद्रीय मंत्रिमंडळात येण्यापूर्वी कुरियन यांनी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. याशिवाय, ओ. राजगोपाल हे रेल्वे राज्यमंत्री असताना कुरियन यांनी त्यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.
  • त्यांनी कला शाखेतून पदव्युत्तर पदवी आणि कायद्याची पदवी घेतली आहे. एक निष्णात वकील म्हणून त्यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयात वकिली केली आहे.
  • 2016 च्या केरळ विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुथुपल्ली मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, मात्र काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री ओम्मन चंडी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.
  • 9 जून 2024 रोजी त्यांचा तिसऱ्या मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला होता. त्यानंतर ते मध्य प्रदेशातून राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले होते.