पहिल्याच मुसळधार पावसात मुंबई-गोवा महामार्ग खचला; लाकडाने भरलेला ट्रक पलटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन झाले असून पहिल्याच पावसाने मुंबई-गोवा महामार्ग खचल्याची घटना घडली आहे. महामार्ग कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. आवाशी येथे महामार्गाचा रस्ता तब्बल दीड फूट खचल्याने लाकडाने भरलेला एक अवजड ट्रक अचानक पलटी होऊन अपघात झाला.

या परिसरात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मात्र पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न झाल्याने वाहतूक जुन्या रस्त्यावरून सुरू होती. पहिल्याच पावसात हा रस्ता खचल्याने महामार्ग अपघाताना आमंत्रण देत आहे.

दरम्यान, पलटी झालेला ट्रक बाजूला करण्याचे काम भर पावसात युद्धपातळीवर सुरू असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महामार्गाच्या निकृष्ट कामांबाबत संबंधित यंत्रणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.