‘हिटमॅन’ रोहित शर्माचा ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरव, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा माजी कर्णधार हिटमॅन रोहित शर्माला राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांच्या हस्ते मंगळवारी (23 जून 2026) ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रोहितने आपल्या धारधार फलंदाजीच्या जोरावर संघाला अनेकवेळा सामने जिंकवून देण्याच मोलाची कामगिरी पार पाडली आहे. तसेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने 2024 मध्ये बार्बाडोस येथे ICC T20 World Cup आणि 2025 मध्ये दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली होती.

रोहित शर्मा हा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. त्याने 285 सामन्यांमध्ये 48.83 च्या सरासरीने आणि 92.97 च्या स्ट्राईक रेटने तब्बल 11,720 धावा चोपून काढल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात 264 धावांची सर्वोच्च वैयक्तिक खेळी करण्याचा आणि तीन द्विशतके झळकावण्याचा जागतिक विक्रमही त्याच्या नावावर आहे. याशिवाय, त्याने 67 कसोटी सामन्यांत 12 शतकांसह 4,301 धावा केल्या आहेत, तर 159 टी-20 सामन्यांत 4,231 धावांचा डोंगर उभा केला आहे.

रोहित शर्मा 2024 चा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी20 ला रामराम ठोकला. रोहित शर्मा 150 हून अधिक आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणारा जगातील पहिला खेळाडू आहे. दरम्यान, राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यात एकूण 65 जणांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले, ज्यामध्ये 2 पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश होता.