
राज्याच्या गृहविभागाने पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर विद्यमान पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (ACB) बदली करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले असून, यात सर्वाधिक लक्षवेधी ठरणारी बदली नागपूरची आहे. सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अपर पोलीस महासंचालक म्हणून धडाकेबाज कामगिरी करणारे विश्वास नांगरे पाटील आता नागपूर शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतील. त्यांच्या रिकाम्या झालेल्या जागेवर म्हणजेच एसीबीच्या अपर पोलीस महासंचालक पदावर आता डॉ. रवींद्र सिंघल यांची वर्णी लागली आहे.





























































