
बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. मुंबई कॉरिडॉरवर भरधाव फॉर्च्युनर कारने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील एका डॉक्टर दाम्पत्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्यांची दोन मुले आणि कार चालक असे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
डॉ. सय्यद असिफ सय्यद उमर (52) आणि त्यांच्या पत्नी गुलसितान बी सय्यद असिफ (45) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर मुलगी नबा सय्यद आसिफ (18), मुलगा सय्यद अजबमाझ सय्यद असिफ (25) आणि कार चालक शेख साजिद शेख फरीद (36) हे जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी 6.27 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर नियंत्रण कक्षाकडून मलकापूर-समृद्धी महामार्ग सिंदखेड राजा उपकेंद्राला चॅनेल क्रमांक 326.5 (मुंबई कॉरिडॉर) वर अपघात झाल्याची माहिती देण्यात आली.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील सोळंके पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्वरित बचावकार्य सुरू केले. अपघातातील गंभीर जखमींना प्राथमिक उपचारासाठी तातडीने सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जालना येथे हलवण्यात आले आहे. तसेच, दोन्ही मृतांचे मृतदेह रुग्णवाहिकेने सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. घटनास्थळावरून दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.






























































