
घाटमाथ्यावरचा शेतकरी आणि कोकणातील शेतकरी यांच्यात जमीन-आस्मानचा फरक आहे. कोकणातील शेतकऱ्यांकडे जास्तीत जास्त एक-दीड एकर जमीन असते. सरकारने आंबा बागायतदारांना गुंठ्याला २२० रूपये नुकसान भरपाई जाहीर केली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत आहे. सरकारला जाग आणण्यासाठी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून कोकणातील शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी आंदोलन करावे लागेल, असा इशारा खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रथमेश गावणकर यांनी दिला. ते गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंबा बागायतदारांच्या धरणे आंदोलनात बोलत होते.
कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था आंबा बागायतदारांच्या प्रलंबित मागण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. हवामानातील बदल आणि अवकाळी पाऊस यामुळे यंदा आंब्याचे २० टक्के पीक आले होते. युध्दजन्य परिस्थितीमुळे आंब्याला कमी दर मिळाला. आंबा बागायतदारांच्या नुकसानीकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. तुटपुंजी नुकसानभरपाई जाहीर करून आंबा बागायतदारांची चेष्टा केली. याविरोधात आंबा बागायतदारांनी जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात बागायतदारांनी आपल्या मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत. त्यामध्ये २०१५ पासून आंबा बागायतदारांना सरसकट कर्जमाफी करावी. यंदा २० टक्के आंबा उत्पादन आल्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ५ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी. कोकणात फळप्रक्रिया, कृषी पर्यटनावर आधारित प्रकल्प आणावेत. प्रदुषणकारी प्रकल्प आणू नयेत अशा मागण्या करण्यात आल्या.
या आंदोलनात कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था उपाध्यक्ष प्रकाश साळवी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील,विभागप्रमुख किरण तोडणकर, खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रथमेश गावणकर व इतर बागायतदार उपस्थित होते.




























































