कल्ट सिनेमा – तुकड्या तुकड्याने कल्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सोहम पिंगळीकर, [email protected]

गेल्या वर्षी दिल्ली हायकोर्टात तब्बल बत्तीस वर्षांपूर्वीच्या एका सिनेमाबाबत वेगळीच केस दाखल झाली. निर्मात्यांची तक्रार होती की, त्यांच्या सिनेमातील पात्रं आणि संवाद वापरून कप, टी-शर्ट, डायऱया, पोस्टर्स अशा तऱ्हेतऱ्हेच्या अनधिकृत वस्तू बाजारात विकल्या जात आहेत. सिनेमाची पायरसी होणे ही नवीन गोष्ट नाही, पण एखाद्या चित्रपटातील संवाद, पात्र किंवा एखादा प्रसंग यांनाही पूर्ण चित्रपटाइतकंच मूल्य असू शकतं का? हा नवाच प्रश्न या प्रकरणातून समोर आला. हा सिनेमा जणू लहान-लहान तुकड्यांमध्ये बाजारात फिरत होता. न्यायालयानेही चित्रपटातील पात्रं, संवाद ही निर्मात्याची बौद्धिक संपदा असल्याचं मान्य केले व परवानगीशिवाय त्यांच्यावर आधारित वस्तू तयार करण्यास आणि विकण्यास बंदी घातली.

आता हा काही बी-ग्रेड किंवा फारसा अपरिचित सिनेमा नाही. या खटल्याच्या केंद्रस्थानी होता आमीर-सलमानचा ‘अंदाज अपना अपना.’ खलनायकाचा अड्डा, जुळा भाऊ, अदलाबदल, स्वप्नरंजन, गुंडांपासून सुटका असे हिंदी सिनेमातील जवळ जवळ प्रत्येक क्लिचे या चित्रपटात आहेत, पण इतर सिनेमांप्रमाणे त्यांचा गंभीरपणे वापर करण्याऐवजी ‘अंदाज अपना अपना’ त्यांचीच खिल्ली उडवतो. आमीरचा ‘अमर’ आणि सलमानचा ‘प्रेम’ ही पात्रं त्यांच्या त्या काळच्या स्टार प्रतिमांवर आधारलेली आहेत. त्या काळी कॉमेडी हा स्वतंत्र सिनेप्रकार म्हणून अजून रूढ झाला नव्हता, ती मुख्य कथानकात मिसळलेली असायची. ‘अंदाज अपना अपना’ने हे समीकरणच उलटं केलं.

आश्चर्य म्हणजे मला ‘अंदाज अपना अपना’मधले जवळ जवळ सगळे महत्त्वाचे प्रसंग माहिती आहेत, पण हा सिनेमा एकदाही सलग बसून सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिल्याचं मला आठवत नाही. कथा आठवत नसली तरी ‘‘ये जॅकेट अमेरिका से लिया है?’’ ‘‘नहीं, न्यूयॉर्क से लिया है!’’ असे प्रसंग म्हणजेच हा सिनेमा, असं आपण समजू लागतो. हळूहळू क्राईम मास्टर गोगोचे व्हॉट्सअॅप स्टिकर्स किंवा तेजाचे रील्स मूळ कथानकाचीच जागा घेतात आणि पूर्ण सिनेमा पाहिल्याचं समाधान देतात. हे फक्त ‘अंदाज अपना अपना’पुरतं मर्यादित नाही. ‘शोले’, ‘हेरा फेरी’ किंवा मागच्या लेखातला ‘गुंडा’ यांचंही काहीसं असंच झालं आहे. अनेकांना या चित्रपटांचं संपूर्ण कथानक आठवत नसलं तरी त्यातले संवाद, पात्रं आणि प्रसंग मात्र आजही सहज आठवतात.

हे होण्यामागचे एक कारण मौखिक परंपरेत सापडतं. भारतात रामायण-महाभारतासारखी महाकाव्यंसुद्धा सुरुवातीला छोट्या प्रसंगांमधून आपल्याला समजतात, त्यातल्या पात्रांमुळे लक्षात राहतात. भारतीय प्रेक्षकांचं सिनेमाशी असलेलं नातंही काहीसं तसंच आहे. फरक इतकाच की, इथे आधी पूर्ण कथानक पाहिलं जातं आणि कालांतराने त्याचं विघटन होतं. काळ जसजसा पुढे सरकतो, तसतसे हे तुकडे मूळ कथेपासून अलग होऊ लागतात. त्यांना पूर्ण चित्रपटाची गरज उरत नाही. ‘‘आप पुरुष ही नहीं, महापुरुष है’’ अशा संवादांचे संदर्भ बदलतात, पात्रं नव्या विनोदांत शिरतात आणि नवनव्या अर्थांनी वापरली जातात. त्यामुळे सिनेमा आपल्या स्मरणात एकसंध कथानक म्हणून राहत नाही, तो असंख्य छोट्या तुकड्यांमध्ये विभागला जातो.

अनेकदा हे तुकडे मूळ चित्रपट न पाहिलेल्या प्रेक्षकांपर्यंतही पोहोचतात. मग ‘‘तेजा मैं हूँ, मार्क इधर है’’ हा एक संवाद न राहता संपूर्ण सिनेमाचं प्रतिनिधित्व करू लागतो. यातलं काय लक्षात राहील याला काही नियम नसतो. प्रत्येकाच्या स्मरणात वेगवेगळे तुकडे टिकून राहतात आणि त्या तुकड्यांच्या कोलाजमधून प्रत्येकाच्या मनात त्या सिनेमाची एक स्वतंत्र आवृत्ती तयार होते.

आज सोशल मीडिया आणि एआयच्या युगात हा प्रवास आणखी वेगाने घडतो आहे. एखादा संवाद, एखादं पात्र किंवा एखादा चेहरा काही क्षणांत रील, मीम, स्टिकर किंवा टी-शर्टवर पोहोचतो. कदाचित म्हणूनच त्या न्यायालयीन प्रकरणाला वेगळं महत्त्व प्राप्त होतं. इथे केवळ पूर्ण चित्रपटालाच नव्हे, तर त्याच्या तुकड्यांनाही आर्थिक मूल्य प्राप्त झालं आहे. कायदेशीर कॉपीराइट अजूनही निर्मात्यांकडे असला तरी तीन दशकांत सिनेमा प्रेक्षकांच्याच मालकीचा झाला आहे. अमर-प्रेम, क्राईम मास्टर गोगो किंवा ‘‘आपका प्लॅन ही गलत है’’ यांचे एका सिनेमापलीकडे वेगळं अस्तित्व आहे असं म्हणता येईल. ‘अंदाज अपना अपना’ कल्ट आहे की नाही, यावर मतभेद असू शकतात, पण मुख्य प्रवाहातला एखादा सिनेमा आपल्या कथानकापेक्षा त्याच्या तुकड्यांमुळे अधिक काळ जिवंत राहू शकतो, याचं याहून उत्तम उदाहरण शोधणं कठीण आहे. (लेखक चित्रपट समीक्षक, अभ्यासक आहेत)