दखल – संदर्भाच्या फितूर होण्याचा लेखाजोगा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. अनिल कुलकर्णी

ज्या संदर्भात माणसं जगलेली असतात, ती जेव्हा बदलतात, फितूर होतात, तेव्हा एकाकी होण्याची संभावनाची, नैराश्याची भावना जास्त असते. सभोवताली पसरलेल्या उजाड वस्त्या, फितूर झालेले हंगाम, डाटा जीबीवरचे जग, व्यवस्थेच्या टाचाखाली जगणारी हतबल माणसं पाहून येणारी हतबलता या सर्व बाबींचा धांडोळा कवी स्वप्नील मेश्राम यांनी घेतला आहे. अनेकांची भाकर कविता लिहीता लिहीता करपते. स्वप्ने वाहून जायला निमित्त लागतं.

स्वप्नील मेश्राम यांच्या कविता केवळ अस्वस्थ करत नाहीत तर विचार करायला प्रवृत्त करतात. विचारांची बैठक एकदा पक्की झाली की आचारांची उंची सहज गाठता येते. तुमच्या व्यक्तिमत्त्वावर जेव्हा निष्ठा, मूल्य याचा परिणाम होतो तेव्हाच तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आकार येतो. या कविता आपल्या मनात रूंजी घालतात, तेव्हा त्यांचे संदर्भ जीवनात जेव्हा आपण शोधतो तेव्हा काही संदर्भ फितूर झाल्याचे आपल्याला जाणवते. आपलेच बोट धरून चालायला लागणारे जेव्हा आपल्यालाच हात दाखवतात, तेव्हा कोण आपले व कोण फितूर याची सीमारेषा स्पष्ट होते. एका कवितेत कवी म्हणतो,

उत्सव करायला शिक मित्रा, आयुष्याचा

आपल्या आजूबाजूचे तपासून घे चेहरे

जे बदलतील केव्हाही आणि दाखवतील
आपला रंग…

स्वप्नील मेश्राम यांचा हा पहिलाच कवितासंग्रह यामध्ये एकूण 69 कविता आहेत. तिसरं युद्ध या कवितेत कवी म्हणतो,

सामान्य प्रश्नांना दखल मिळत नाही

कशु हलवली जातात सूत्र कळत नाही

तेव्हा इथल्या तरुणांनी कुणाकडे पाहून जगायचं?

कवी म्हणतो फोटो क्लिक करण्यासारखीच असते कविता. बुर्ज खलिफासारख्या उंच स्वप्नांनादेखील आता तडे जात आहेत. सगळ्या प्रश्नांना कुठे वाचा फुटते?

काही प्रश्नांनाच फिनिक्स होता येतं. अनेक प्रश्न जमिनीत गाडले जातात भूकंप होण्याच्या प्रतीक्षेत, तप्त लाव्हा बनून उफाळण्याच्या प्रतीक्षेत जन्मोजन्मी असतात  निद्रीस्त. फोर बीएचके फ्लॅटमध्येसुद्धा स्वप्नांना मिळत नाही स्पेस. प्रत्येकाचे संवाद येथे कुपीबंद. आत काय आहे याचा थांगपत्ता लागू न देण्यासाठी सर्वांनी मनाला केलंय बंदिस्त.

आमच्या घरातला माठ या कवितेत कवी सांगतो, बाबासाहेबांना जवळून पाहिल्याचा प्रसंग ‘सारे आभाळ उजळून निघाले दोन सूर्य एकमेका समोर उभे होते!’ आजाच्या डोळ्यांत त्यांच्या नजरेतून बाबासाहेब कसे दिसत असतील, हे आठवतो तेव्हा आमच्या घरातला माठ मला आता चवदार तळेच वाटतो! अब्राहम लिंकनची आई या कवितेत तुम्ही  लिहिलेल्या ‘मुख्याध्यापकांना पत्र’मुळेच माझ्यावर संस्कार केलेत आईने. शिक्षकांना सांगायची ती पोरगं हुशार आहे, फक्त तुम्ही शिकवा, तो आपोआप घडेल.

काही प्रश्नांची उत्तरं या कवितेत कवी म्हणतो, आयुष्य जगता यायला हवे, काही प्रश्नांना टाळून, काही प्रश्नांची उत्तरं अनुत्तरीत ठेवून. आयुष्य एक दीर्घ कविता या कवितेत-

संवेदनाच्या वस्तीत कोणी पेरावी अशांतता एवढं जगणं व्हावं मलूल?

गळून पडावे सारी जगण्याची पिसं

लटकवून  टाकावेत आपले दोन हात,

छाटून घ्यावेत आपल्या समृद्धतेचे पंख

आशयाशी मैत्री केल्यावर सुचावी आयुष्याची एक दीर्घ कविता. कुठल्याच वस्तीचं होऊ नये या कवितेत-

कुठल्या माणसांचा  हिरावला

जाऊ नये त्यांना मिळालेला श्वास,

महासत्तेच्या सावटाखाली कुठल्या वस्तीच, शहराचं होऊ नये कधी अफगाणिस्तान!

सभोवतालच्या भवतालाची जो दखल घेतो, तोच खरा कलावंत व त्याच्या हातूनच कला साकारते. संदर्भ जेव्हा फितूर होतात तेव्हा मनाच्या विदीर्ण होण्याचा कोलाज आपल्याला अंतर्मुख करतो. अंतर्मुख झाल्याशिवाय मनातला फिनिक्स बाहेर येत नाही. अस्वस्थ करणारा व विचार प्रवर्तकाकडे नेणारा हा काव्यसंग्रह आहे.

फितूर दिवसांचे संदर्भ
कवीः स्वप्नील मेश्राम
प्रकाशनः अष्टगंध प्रकाशन
पृष्ठेः 96, किंमतः रु. 200