अभिप्राय – ध्येयपूर्तीचा संघर्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अशोक सावंत

कुटुंबवत्सल राहून समाजकारण आणि राजकारण कसे करावे, निष्ठेच्या प्रवासाचा संघर्ष करून ध्येयप्राप्ती कशी करावी, यासाठी मानसिक ऊर्जादायक पुस्तक म्हणजे अॅड. मनमोहन चोणकर लिखित व प्रकाशित पुस्तक ‘निष्ठेच्या प्रवासाचा संघर्ष.’ हे पुस्तक म्हणजे पाच वर्षीय नगरसेवक पदाचा फक्त कार्य अहवाल नाही, तर हे पुस्तक म्हणजे माणूस म्हणून काम करताना ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ याची वास्तव प्रचीती आहे.

राजकीय निष्ठेचा किंवा वैयक्तिक श्रद्धेचा प्रवास म्हणजे काय? तो प्रवास किती खडतर असतो, सतत संघर्षमय असतो आणि तरीसुद्धा कौटुंबिक, सामाजिक, राजकीय आघाडीवर कसे ठामपणे, निधडय़ा छातीने उभे राहायचे याची प्रेरणा, ऊर्जा देणारे हे पुस्तक आहे.

निष्ठा आणि संघर्ष यांच्या अनेक मनोवेधक वास्तवकथा या पुस्तकात आहेत. नवोदित गृहनिर्माण संस्थेसाठी संघर्ष… जात प्रमाणपत्रासाठी संघर्ष… नामदार नाना शंकरशेट यांच्या स्मारकासाठी भूखंडाकरिता संघर्ष… ‘नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस’ नामकरण प्रवास संघर्ष… राज्य सहकारी बँक निवृत्त कर्मचारी उदरनिर्वाह भत्ता मिळवण्यासाठी संघर्ष. अॅड. मनमोहन चोणकर आत्मश्रद्धेने म्हणतात, ‘संघर्ष माझ्या पाचवीला पुजला आहे.’

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी अस्तित्वाचा परिसस्पर्श झालेले अॅड. मनमोहन चोणकर निष्ठेने तेजाळून कार्यतत्पर राहतात. अनेक मान्यवरांचा सहवास, पुरस्कार आणि सन्मानप्राप्त अॅड. मनमोहन चोणकर निर्भीड, निरहंकारी, आहेत. या पुस्तकात अमृत महोत्सवानिमित्त अनेक क्षेत्रांतील मान्यवरांनी अॅड. मनमोहन चोणकर यांच्याविषयी लेख लिहिले आहेत. अॅड. मनमोहन चोणकर हे फक्त पत्रलेखक नाहीत, तर ते अन्यायाविरुद्ध ग्राऊंड लेव्हलवर लढणारे संघर्षयोद्धे आहेत. अॅड. मनमोहन चोणकर यांच्या कार्यकर्तृत्वात जिद्द, निष्ठा, संघर्ष, अक्षय मानसिक ऊर्जा असे मौल्यवान, तेजस्वी पैलू आहेत.

निष्ठेच्या प्रवासाचा संघर्ष
लेखक प्रकाशकः अॅड. मनमोहन चोणकर
पृष्ठेः 90, मूल्यः रु. 100