
मोदीबाबा सांगतात, सोनं खरेदी करू नका, पण आमदार-खासदार खरेदी करा. अरे, सोनं खरेदी करण्याची ताकदच तुम्ही ठेवलेली नाही देशातील नागरिकांची, कसं करणार सोनं खरेदी, असा जबरदस्त टोला लगावत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा आणि गँग ऑफ गद्दारचा चांगलाच समाचार घेतला. काँग्रेसशी लढत असताना वाजपेयी आणि आडवाणी यांनी आम्हाला निधी मिळत नाही, आम्ही आता काँग्रेसमध्ये जातो असे म्हटले असते तर मोदी, अमित शहांचा राजकीय जन्म झाला असता का असा सवाल करतानाच उद्धव ठाकरे यांनी, गद्दारांनी ही गद्दारी तुमच्या, आमच्याशी केली. स्वतःच्या आईबरोबर केली. शिवसेनेशी केली. एवढेच नाही तर हिंदू आणि हिंदुत्वाशी गद्दारी केली आहे. त्यामुळे हे गद्दार जिथे सापडतील तिकडे त्यांना आणि भाजपला जाब विचारा असे आवाहन केले.
शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या सहा खासदारांविरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. ज्या मतदारांनी, शिवसैनिकांनी या गद्दारांना निवडून दिले त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा झंझावाती दौरा आजपासून सुरू झाला. वाशीम-यवतमाळ, हिंगोली मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, आमदार नितीन देशमुख, शिवसेना नेते विनायक राऊत आदींची उपस्थिती होती.
कुणाकुणाच्या शपथ घेऊन सांगत होते, गद्दारी करणार नाही! पण शेवटी गद्दार ते गद्दारच! गद्दारांच्याच कळपात गेले. चूक तुमची नाही, माझी आहे. केवळ माझ्या शब्दाखातर तुम्ही या गद्दारांना निवडून दिले. पुढील तीन वर्षे आता गद्दार दिसला की, त्याला विचारा… बोल, गद्दारी का केलीस? जाब विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे. मात्र जाब केवळ या गद्दारांना विचारून चालणार नाही, भाजपलाही विचारावा लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेना फक्त एकच आहे. गद्दार सेना म्हणजे शिवसेना नाही. कुणीही उपरा आला आणि त्याला नाव दिले हे आम्ही मानायला तयार नाहीत. शिवसेना, भगवा फक्त एकच असून या भगव्याचा, शिवसेनेचा खासदार निवडून आणण्यासाठी आजपासून तयारीला लागा. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात, तोपर्यंत मी कुणालाही घाबरत नाही. जोपर्यंत तुम्ही सोबत आहात तोपर्यंत कुणी कितीही प्रयत्न केले तरी ठाकरेच काय शिवसेना संपवू शकणार नाहीत.
आईची शपथ घेतली अन् गद्दारी केली
भाषण सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी गद्दार खासदार संजय देशमुख यांच्या मुलाखतीची एक क्लिप ऐकवली. ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एक वाक्य आठवते. वयाच्या पंधराव्या वर्षी शिवसैनिक झालो. जेव्हा कुणी संकटात असेल तेव्हा जात, पात, धर्म न पाहता त्याच्या मदतीसाठी धावून गेले पाहिजे. आज शिवसेना संकटात होती. माझी आई 83 वर्षांची. तिने सुद्धा सांगितले की, शिवसेनेसाठी आपण जायला हवे. शिवसेनेला सहकार्य कर. आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ठाकरेंसोबत आलो’ उद्धव ठाकरे यांनी क्लिप ऐकवताच समोर उपस्थितांतून ‘गद्दार, गद्दार’ अशा आरोळय़ा उठल्या! हाच धागा पकडून उद्धव ठाकरे म्हणाले, आईची शपथ घेऊन गद्दारी! खरोखरच काय वाटत असेल त्या आईला? चूक आपल्या सगळय़ांची झाली, विशेषतः माझी. अगोदर त्यांनी एकदा गद्दारी केली होती, आता आईची शपथ घेऊन गेले! आणि संकटाची भाषा कशाला करता?
खासदार फोडण्याची वेळ का आली?
एकदा केली ना फोडाफोडी. शिवसेना संपली असे म्हणता. पक्ष चोरला, चिन्ह चोरले. तरीही ठाकरे उभा आहे. आमदार फोडल्यानंतर जनतेने या गद्दारांच्या नाकावर टिच्चून आपले नऊ खासदार निवडून दिले. मशाल या चिन्हावर ते निवडून आले. ते फोडण्याची का वेळ आली? मोदी लाट तुडवून शिवरायांच्या महाराष्ट्राने महाविकास आघाडीचे 31 खासदार दिल्लीत पाठवले. कुठे गेली ती मोदींची लाट? असा घणाघाती सवाल करत उद्धव ठाकरे यांनी खासदार फोडण्याची वेळ का आली तर डिलिमिटेशन विधेयक मंजूर घेण्यासाठी. संविधान बदलायचे आहे म्हणून खासदार लागतात असा हल्लाबोल केला.
भाजपचे सदस्यत्व ग्राह्य धरणार का?
आता आपल्याकडे एसआयआर सुरू होणार आहे. रेशनकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट हा नागरिकत्वाचा दाखला नाही म्हणे! मग काय भाजपचे सदस्यत्व ग्राहय़ धरणार का? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावताच टाळय़ांचा कडकडाट झाला. भाजप असाच आहे, आणि भाजपचे वर्तन असेच राहिले तर हा पाकिस्तान जनता पक्ष होतो की काय, अशी चिंता वाटायला लागली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सिद्धार्थ देवळे तुम्ही तयारीला लागा
विधानसभेला लाखभर मते घेऊनही आपला उमेदवार पडला, कारण त्यावेळीही याच गद्दाराने विरोधात काम केले होते. आता पुढच्या निवडणुकीत डॉ. सिद्धार्थ देवळेच आपले उमेदवार असतील, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी देवळे तुम्ही तयारीला लागा असे आदेशच दिले.
गद्दार खासदारांविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या यवतमाळ येथील सभेसह हिंगोली, वाशीम येथील सभांनाही शिवसैनिकांचे तुफान उसळले.
पत्थर सारे बॉम्ब बनेंगे,
भक्त बनेगी सेना।
झाडू झडले शस्त्र बनेंगे,
नाव लगेगी किनारे।।
या संत तुकडोजी महाराजांच्या भजनाचे स्मरण उद्धव ठाकरे यांनी यावेळी करून दिले.
विकासनिधी मिळत नव्हता अशी कोल्हेकुई गद्दार करत आहेत. पण याचाही भांडाफोड झाला आहे. विकास निधी काय फक्त भाजपच्या बापाच्या मालकीचा आहे का? भाजपविरोधात जे खासदार निवडून आलेत ते काय पाकिस्तानातून आलेत? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांनी समाजकार्याचा एव्हरेस्ट उभा केला, त्यांना नाही लागला निधी! गाडगे महाराजांची दशसुत्री प्रसिद्ध आहे. भुकेल्याला अन्न देणे, तहानलेल्यास पाणी देणे, घर नाही त्याला छप्पर देणे, वस्त्र्ा नसेल त्याला वस्त्र्ा देणे. एवढा स्वच्छतेचा महायज्ञ त्यांनी राबवला. त्यांचे कुठे विकासनिधी वाचून अडले? तुकडोजी महाराजांनी भजनातून राष्ट्रभक्तीचा अंगार पेटवला, म्हणून त्यांना आपण राष्ट्रसंत म्हणतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ही समोर बसलेली माझी सेनाच आहे. आपल्याला स्वातंत्र्यही लढूनच मिळाले आहे. गद्दारांविरोधातली लढाईही मोठी आहे. पण आपण ती जिंकणार म्हणजे जिंकणारच, असा दुर्दम्य विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
राममंदिर लुटणारे हे नवे बाबर!
गद्दारी तुमच्या आमच्याशी नाही झाली. गद्दारी स्वतःच्या आईबरोबर केली. शिवसेनेसोबत केली. अयोध्येतील राममंदिराच्या दानपेटीतील पैसे चोरले जात आहेत. चांदीच्या विटा चोरीला गेल्या आहेत. शिवसेनेने देणगी दिली होती त्याचे काय झाले माहिती नाही. चांदीच्या विटा दिल्या होत्या त्या कुठे आहेत माहिती नाही. शिलापुजनाच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुखांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. मंदिर वही बनायेंगे, काय वातावरण होते ते मंतरलेले! मंदिर झाले आणि नवे बाबर आले! दानपेटीवरच यांनी दरोडा टाकला. हा हिंदुत्वाचा अपमान आहे. ही गद्दारी शिवसेनेशी नाही, ही गद्दारी हिंदुत्वाशी, हिंदूंशी आहे. जाब फक्त गद्दारांना विचारून चालणार नाही, तर भाजपलाही विचारावा लागेल असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आपण मोठय़ा विश्वासाने यांना उभे केले आणि गद्दारी करून हे निघून गेले. शेवटी गद्दारच. गद्दारांच्याच कळपात गेले. तीन चार वर्षांपूर्वी गद्दार शिरोमणी, जो बसलाय तिकडे.. मिंधे! त्याने 40 आमदार फोडले. तेव्हा बैलपोळा होता. विदर्भात शेतकऱयांनी बैलांवर लिहिले होते.. पन्नास खोके, एकदम ओक्के! तेव्हा आमदाराचा भाव 50 खोके असेल तर आता खासदाराचा किती असेल? म्हणजे हा धंदा झालाय. निवडून यायचे, आपला हमीभाव वाढवायचा आणि स्वत्व, स्वाभिमान विकून टाकायचे सगळे!
आमचे हिंदुत्व माणुसकीशी नाते सांगणारे आहे, तुमचे हिंदुत्व मंदिर लुटणारे आहे! राममंदिरात जे काही सध्या चालले आहे ते भयंकर आहे. हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर अधूनमधून सकल हिंदुत्ववाले जागे होतात! मोर्चे वगैरे काढतात. राममंदिराच्या प्रश्नावर मात्र मौनात गेले आहेत. संजय राऊत यांनी त्यावर चांगला अग्रलेख लिहिला आहे. ‘सामना’च्या वेबसाईटवर जाऊन तो मुद्दाम वाचा. आम्हाला आता भाजपमुक्त राम पाहिजे आणि शिवसेना त्यासाठी लवकरच आंदोलन करणार.
भोंदूंच्या विळख्यात सापडलेल्या श्रीरामाला सोडवण्यासाठी शिवसेना पहिली ठिणगी महाराष्ट्रात टाकेल!
केवळ माझ्या शब्दाखातर तुम्ही या गद्दारांना निवडून दिलेत. शिवसैनिकांनी हे निवडून यावेत म्हणून रक्ताचे पाणी केले. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची माफी मागतो. आपण मतदान करताना बोटाला काळी शाई लावली, पण यांनी गद्दारी करून आपल्या विश्वासाला काळे फासले आहे. विश्वासघाताचा हा राग सतत धुमसता ठेवा. पुढील तीन वर्षे आता एकच कार्यक्रम, जिथे दिसेल, तिथे विचारा… बोल, गद्दारी का केलीस?
हे कसले ऑपरेशन टायगर, हे तर ऑपरेशन देवेंद्र!
खासदारांची फोडाफोडी म्हणजे ऑपरेशन टायगर म्हणे! हे कसले ऑपरेशन टायगर, हे तर ‘ऑपरेशन देवेंद्र’ आहे. काल नागपूरला येताना विमानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सोबत होते. त्यावर, ‘उच्चस्तरीय चर्चा’ झाली! फडणवीसांचा दिल्लीत येण्याचा मार्ग रोखला जात आहे. जेव्हा गरज पडेल तेव्हा हेच खासदार अमित शहांच्या पाठीशी उभे राहतील. गुलाम बनलेल्या मिंध्यांकडे या खासदारांना पाठवले. त्याचे कारण हे असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.


























































