
>> वर्षा कारळे ([email protected])
भारतीय कलेला जागतिक स्तरावर अधिक व्यापक ओळख मिळवून देणारी संस्था म्हणजे द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया. संस्थेद्वारे आयोजित चित्रयात्रेचा अनुभव मांडणारे ‘बिनसर, अल्मोरा – निसर्गचित्रांचे प्रदर्शन’ पाहावे असेच आहे.
भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित कला संस्थांपैकी एक म्हणजे द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया. गेल्या शतकभरात संस्थेने भारतीय कलेचा प्रचार-प्रसार, कलाकारांचे संवर्धन आणि कला संस्कृतीच्या जतनासाठी मोलाचे योगदान दिले आहे. अखिल भारतीय वार्षिक कला प्रदर्शन, स्टडी सर्कल, लाइफ स्टडी व न्यूड स्टडी सत्रे, कार्यशाळा, व्याख्याने, प्रात्यक्षिके, कला शिबिरे आणि अभ्यासदौरे यांसारख्या उपक्रमांद्वारे संस्थेने अनेक पिढय़ांतील कलाकारांना घडविण्याचे कार्य केले आहे.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून यंदाची चित्रयात्रा उत्तराखंडमधील बिनसर येथे आयोजित करण्यात आली होती. यात सहभागी कलाकारांच्या कलाकृतींचे ‘बिनसर, अल्मोरा – निसर्गचित्रांचे प्रदर्शन’ पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई येथे द आर्ट सोसायटी ऑफ इंडियातर्फे 26 जून ते 2 जुलै 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या बिनसरच्या पर्वतरांगा, धुक्याने नटलेल्या दऱया, बदलते प्रकाशछाया आणि निसर्गातील सूक्ष्म रंगवैभव यांचे प्रभावी प्रतिबिंब या चित्रांमधून अनुभवता येते. प्रदर्शनात दीपक पाटील, अरविंद राठोड, योगिता राणे, सीमा पाठक, श्रुती काळे, स्नेहल पागे, सुलभा चांदणे, सेजल शाह, नविता बन्सल, रिटा पुरोहित आणि शीतल बावकर या कलाकारांनी बिनसर येथे प्रत्यक्ष निसर्गाच्या सान्निध्यात साकारलेल्या कलाकृती प्रदर्शित केल्या आहेत.
संस्थेच्या कार्यातील एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे वर्षातून विविध ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱया स्टडी टूर्स आणि चित्रयात्रा. कलाकारांना निसर्गाच्या सान्निध्यात काम करण्याची, एकमेकांकडून शिकण्याची आणि कलात्मक दृष्टी अधिक समृद्ध करण्याची संधी या उपक्रमांमधून मिळते. फेब्रुवारीतील वार्षिक प्रदर्शनानंतर मार्च-एप्रिलमध्ये 22 कलाकारांचा समूह बिनसर येथे एकत्र आला. बिनसर येथे कलाकारांना जणू निसर्गाचा एक विशाल कॅनव्हासच खुला झाला. ढगांच्या सान्निध्यात, पर्वतरांगांच्या साक्षीने आणि बदलत्या प्रकाशछटांमध्ये कलाकारांनी सलग नऊ दिवस निसर्गचित्रण केले. वरिष्ठ कलाकारांच्या मार्गदर्शनामुळे सहभागी कलाकारांना अनुभवांची देवाणघेवाण करण्याची आणि आपल्या कलाभिव्यक्तीला अधिक जाणून घेण्याची संधी मिळाली. चित्रनिर्मितीबरोबरच परस्पर संवाद, कलाविषयक चर्चा आणि सामूहिक कलाकृती निर्माण करण्याचा अनुभव या चित्रयात्रेचा विशेष उद्देश होता.
या स्टडी टूरचे संपूर्ण संकल्पनात्मक नियोजन, पूर्वतयारी, प्रत्यक्ष रेकी, प्रवास व्यवस्थापन, निवास व्यवस्था आणि एकूण समन्वय संस्थेचे व्हाईस प्रेसिडेंट दीपक पाटील यांनी पार पाडली. उत्तराखंडमधील विविध स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून कलाकारांसाठी सर्वाधिक प्रेरणादायी आणि अनुकूल ठिकाण म्हणून बिनसरची निवड करण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली.
द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे सदस्य दीपक पाटील, सुनील पुजारी, साधना बहुलकर, अरविंद राठोड, सुशांत कुवेस्कर, किशोर घनकुटकर आणि जॉन बसिल, तसेच ज्येष्ठ सदस्य डॉ. गोपाळ नेने, गायत्री मेहता व दीपक नाफडे यांच्या सहकार्यामुळे असे उपक्रम यशस्वीपणे राबविले जात आहेत.
भारतीय कला आणि कलाकारांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेली द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया आज कला क्षेत्रातील एक प्रेरणादायी, विश्वासार्ह आणि प्रगतिशील व्यासपीठ म्हणून ओळखली जाते. बिनसरची ही चित्रयात्रा आणि त्यातून साकारलेले हे प्रदर्शन केवळ निसर्गचित्रांचे संकलन नसून कलाकारांच्या सामूहिक अनुभवांचे आणि कलेप्रति असलेल्या समर्पणाचे प्रतिबिंब आहे. द आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या शतकोत्तर परंपरेला साजेसा हा उपक्रम संस्थेच्या कलाविकासाच्या ध्येयाला अधिक बळकटी देणारा ठरत असून भारतीय कलाकारांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी दालने खुली करून देण्याच्या संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा तो एक महत्त्वपूर्ण भाग आहे.
(लेखिका ‘द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया‘च्या अध्यक्ष असून पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई येथील कलादालनाच्या क्युरेटर म्हणून कार्यरत आहेत.)
























































