
‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीचे प्रकरण अद्याप ताजे असतानाच आता उद्या रविवारी होणाऱया महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांच्या पात्रता परीक्षेचाही (टीईटी) पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार आज घडला. त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली. भविष्यातील शिक्षक घडवणाऱया या परीक्षेचा पेपर दीड कोटी रुपयांना थेट भिवंडीत विक्रीसाठी आणण्यात आला. याप्रकरणी कोनगाव पोलिसांनी सापळा रचून धीरज सिंग (28, रा. हरयाणा), राजीव शाव (45), आकाशकुमार सूरजकुमार (30, दोघेही राहणार बिहार) यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडे टीईटी परीक्षेचे चार प्रश्नसंच सापडले. या प्रकरणाचे धागेदोरे थेट दिल्लीपर्यंत पोहोचल्याची माहिती ठाणे शहरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
28 जून रोजी होणाऱया ‘टीईटी’ परीक्षेचा पेपर विक्रीसाठी काही जण भिवंडीत घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांना मिळाली. त्यानुसार डॉ. बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने कोनगाव पोलीस हद्दीतील मुंबई-नाशिक महामार्गावरील ओवळी-डोंगराळी परिसरात सापळा रचला. यावेळी तिघेजण रस्त्याच्या बाजूला गाडी थांबवून उभे असल्याचे दिसले. पोलिसांना संशय येताच त्यांच्यावर झडप घालून तपासणी केली असता त्यांच्याकडे रविवारी होणाऱया टीईटी परीक्षेचे चार प्रश्नसंच सापडले.
पेपरविक्रीचे दिल्ली कनेक्शन
पोलिसांनी तत्काळ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या अधिकाऱयांना बोलावून या प्रश्नपत्रिकांसंदर्भात तपासणी केली असता हे प्रश्नसंच रविवारी 28 जून रोजी होणाऱ्या ‘टीईटी’ परीक्षेचेच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी या तिघांनाही अटक केली. आरोपींनी दिल्लीहून हा पेपर भिवंडीत आणला. तो तब्बल दीड कोटी रुपयांना विकण्याच्या तयारीत ते असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली.
आरोपी उच्चशिक्षित
विशेष म्हणजे, आरोपींपैकी धीरज सिंग हा विज्ञान शाखेच्या पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असून इतर दोघेही उच्चशिक्षित व आर्थिकदृष्टय़ा सधन असल्याचे तपासात उघड झाले.
सूत्रधारांवर ‘मकोका’ लावण्याच्या हालचाली
टीईटी पेपरफुटीतील मुख्य सूत्रधार आणि आरोपींना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याच्या हालचाली सरकारी पातळीवर सुरू आहेत. टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून, या प्रकरणातील आरोपींवर मकोका लावण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
पेपर फुटीविरोधात आज शिक्षक सेनेचे आंदोलन
‘टीईटी’ पेपरफुटीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने उद्या 28 जून रोजी शिक्षक सेना अध्यक्ष आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या उपस्थितीत शिक्षण निरीक्षक कार्यालय, जोगेश्वरी (पूर्व) येथे कार्यालयासमोर दुपारी 2.30 ते 3 वाजता आंदोलन करण्यात येणार आहे.
सूत्रधार फरार; पोलीस पथके रवाना
या प्रकरणाचा सूत्रधार अद्यापही फरार असून पेपर नेमका कुठून बाहेर आला, राज्यातील आणखी किती जणांपर्यंत पोहोचला, यामध्ये शिक्षक अथवा कुणाचा सहभाग आहे का याचा कसून तपास सुरू करण्यात आला आहे. या तपासासाठी दोन सहाय्यक पोलीस आयुक्त, नऊ पोलीस निरीक्षक आणि 20 कर्मचाऱयांचे विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले असून राज्यभर विविध पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी दिली.
लवकरच फेरपरीक्षा
फेरपरीक्षेची तारीख लवकरच परिषदेच्या वेबसाईटवर जाहीर होईल. उमेदवाराकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. तसेच, पुन्हा नोंदणी करण्याचीही आवश्यकता नाही, असे परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी सांगितले.
पेपरफुटीच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन
टीईटी पेपरफुटीप्रकरणी सरकार अॅक्शन मोडवर आले असून ठाण्याचे जॉइंट सीपी पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना फोन करून एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दोषींवर कठोर कारवाई करा, कुणाचीही गय करू नका, असे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत.
तरुणाईने भविष्याची स्वप्नं कधी पाहायची?
‘आधी नीटचा पेपर फुटला. आता टीईटीचा पेपर फुटला. तरुण-तरुणींनी फक्त आंदोलनंच करायची का? भविष्याची स्वप्नं कधी पाहायची?’ असा सवाल शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. भाजपने देशाचे हाल केलेत, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
परीक्षा व्यवस्थेला वसुली व्यवस्था बनवून टाकली!
टीईटी पेपर फुटीवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘आणखी एक पेपर फुटला. आणखी एक परीक्षा रद्द झाली. ही केवळ पेपरफुटी नाही, तर तरुणांच्या भविष्याची चोरी आहे, असा संताप राहुल गांधी यांनी ‘एक्स’ पोस्टद्वारे व्यक्त केला.


























































