
>> रवींद्र मालुसरे
भाऊराव विष्णू घाडीगावकर, वय 75 यांचे मोडी लिपी संवर्धनाचे काम पाहिल्यानंतर माणूस अचंबित होतो. लोक त्यांचा शोध घेत त्यांच्यापर्यंत पोचतात, आपल्याकडील मोडी लिपीतील कागदपत्रे विश्वासाने सोपवितात आणि ठरावीक वेळेतच ते लिप्यंतर करून देत असतात हे अनेक वर्षांपासून चालले आहे. त्यांचे मोडी लिपीतील अत्यंत अभ्यासपूर्ण ‘मोडी लिपी मंथन’ हे पुस्तक. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर सहज विरंगुळा म्हणून त्यांनी मोडी लिपीच्या वर्गात प्रवेश घेतला आणि त्यानंतर या लिपीची एवढी गोडी लागली की, त्यांनी आपले आयुष्यच मोडी लिपीच्या अभ्यासाला वाहून घेतले.
शिवकाळाचा आणि पेशवाईचा वेगवेगळ्या अंगाने वेध घेत विविध विषयावरील उत्तमोत्तम पुस्तके बाजारात येत आहेत आणि त्यांचा चांगला खप होतो आहे. सध्या इतिहासाची गोडी निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टी घडत आहेत. त्यामुळे अलीकडे आपण मोडी लिहिण्या-वाचण्याचे शिक्षण घ्यावे असे वाटणारा मोठा वर्ग समाजात निर्माण झाला आहे. त्यामुळे शासन स्तरावर आणि काही खासगी संस्था मोडी शिक्षणाचे वर्ग देणाऱ्या अनेक चांगल्या संस्था निर्माण झाल्या आहेत. खाजगी किंवा शासनमान्य प्रशिक्षण केंद्रातून काही ठरावीक महिने मोडी लिपीचे अभ्यासक, विशेषत बेसिक अशा सुलभ मोडी अक्षर वळणांचा अभ्यास करून प्रशिक्षण घेतात, परंतु पुढे त्यांच्या समोर कोणत्याही काळाचा मोडी दस्तऐवज वाचावयास आला तर शिवकालीन मोडीतील एकात एक गुरफटलेली, कालौघात क्षतिग्रस्त किंवा अस्पष्ट झालेली मोडी अक्षर वळणे वाचताना अवघड होण्याची शक्यता असते. शिवाय अशा ऐतिहासिक मोडी पत्रांत फार्सा, अरबी, उर्दू शब्दांचा भरणा, शब्दसंक्षेपसुद्धा सर्रास वापरलेले असतात. परिणामी मोडी दस्तऐवजांचे नवशिक्या मोडी अभ्यासकांना वाचन अवघड ठरते. तसेच पेशवेकालीन मोडी पत्रांचे अक्षर जरी सहज वाचता येण्यासारखे सुलभ असले तरी त्यांतील शब्दसंक्षेप, तत्कालीन मराठी भाषा वाक्यरचना तत्काळ समजेलच असे नाही. आंग्लकालीन मोडी अलीकडच्या काळातील असली तरी सर्वच लेखकांची मोडी अक्षरे वाचनीय असतीलच असे नाही. बहुतेकांच्या लेखनशैली व लकबी वेगवेगळ्या असल्यामुळे तसेच लेखणी न उचलता सलग जलद गती लिखाणामुळे आंग्लकालीन मोडी लिपीतील दस्तऐवज अर्वाचीन असले तरी ती वाचावयास दुर्बोध ठरतात.
असे मोडी दस्तऐवज नवशिक्या मोडी अभ्यासकांना मोडी वाचन सरावाच्या अभावामुळे वाचावयास अवघड जाणे स्वाभाविकच आहे. त्यासाठी सराव सातत्याची नितांत आवश्यकता असते. या दृष्टिकोनातून घाडीगावकर यांच्या पुस्तकाचे महत्त्व पटते. देवनागरी व मोडी लिपीतील फरक, काना, वेलांटी, अनुस्वार अशा मात्रांचा देवनागरी लिपीतील समन्वय, या मात्रांची बारा रूपे, मोडी लिपीतील शब्द संक्षेप, ऐतिहासिक पत्रलेखन, कालगणना, शिवकालीन, पेशवेकालीन, आंग्लकालीन पत्र मायने, शिवकालीन पत्रातील शब्दार्थ, पत्रातील लेखकांच्या अक्षर लकबी अशा अनेक विषयांबाबत पत्रातून मार्गदर्शन मिळते.
मोडी लिपीतील काही अक्षरे एकापेक्षा अनेक प्रकारे लिहिलेली असतात. तसेच काही अक्षरांत विलक्षण साम्य असते, सूक्ष्म भेद असतो. हे सारे बारकावे नवागत मोडी वाचकांच्या लक्षात आणून देणे गरजेचे आहे तसेच काही शब्द ओळखता येत नसतील तर संबंधित ओळीतील मागचापुढचा संदर्भ जुळवून तर्कज्ञानाने अडलेला शब्द नेमका कोणता असेल हे ओळखायचे असते. महाराष्ट्राच्या काही मातब्बर घराण्यांनी आपल्या पिढय़ान्पिढय़ांच्या आर्थिक, महसुली तथा देवस्थानातील मानापानाचे मोडी दस्तऐवज जतन करून ठेवलेले आहेत. विविध भागांतील जनसामान्यांकडे उपलब्ध मोडी दस्तऐवज जाणून घेण्यासाठी मोडी लिपी अवगत करण्याशिवाय पर्याय नाही. अशा मोडी लिपी कागदपत्रांचा अस्सल आणि अमूल्य ठेवा महाराष्ट्रातील विविध दप्तरखान्यात जतन करण्यात आला असून त्यांचे वाचन होणे गरजेचे आहे. शिवकाळ, पेशवे काळ आणि आंग्ल काळ अशा तीन कालखंडांतील करोडो मोडी दस्तऐवज महाराष्ट्राच्या विविध पुरालेखागार कार्यालयात वाचकांची प्रतीक्षा करीत आहेत. हा ठेवा हजारो मोडी अभ्यासकांची वाट पाहत आहे. सततच्या सरावामुळे मोडी लिपी अभ्यासक मोडी लिपी वाचनात, लिप्यंतर करण्यात प्रावीण्य मिळवू शकतात. नवशिके मोडी लिपी अभ्यासक कोणत्या टप्प्यावर कोणत्या प्रकारचे वाचन करताना कुठे अडतील हे घाडीगावकर यांना स्वानुभवाने माहिती असल्यामुळे त्याच प्रकारे या पुस्तकाचे लेखन झाले आहे.
























































