
>> डॉ. समिरा गुजर-जोशी
कोलाहलाकुलककुप्कुलतात्र काकाः । काकाकलीकलकलैककलाकुलेषु ।
पुँस्कोकिलेषु कलिला किल कल्यते भोः। किं कालिमाकलितकान्तितयैव गर्वः ।।1।।
क चा अनुप्रास साधलेला असा हा श्लोक आहे.
अर्थः हे कावळ्या, या दिशादिशा गोंधळाने भरून टाकणाऱ्या कावळ्यांच्या थव्यांमध्ये, ‘का-का’ असा कोलाहल करणाऱ्या समूहात, एक कोकिळा जरी मिसळून गेली तरी ती तिच्या मधुर कूजनामुळे सहज ओळखली जाते. मग केवळ काळा रंग प्राप्त झाला म्हणून तू कशाचा गर्व करतोस? खरा गुण लपवता येत नाही आणि खऱ्या गुणवंताला गर्दीतही स्वतंत्र ओळख मिळते. ती ओळख त्याला गुणांमुळे मिळते. दिसण्यामुळे किंवा पोशाखामुळे नाही. कावळा आणि कोकिळा दोघेही काळे पण कोकिळेला सन्मान मिळतो तो तिच्या गोड गायनाने.


























































