बोलीभाषेची समृद्धी – कातकरी बोली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वर्णिका काकडे

कातकरी किंवा कथोडी ही महाराष्ट्रातील एक प्रमुख आदिवासी जमात असून त्यांची स्वतची एक स्वतंत्र ‘कातकरी बोलीभाषा’ आहे. ही भाषा प्रामुख्याने मराठी-कोकणी भाषा कुळाशी संबंधित आहे. भाषिकदृष्टय़ा ती मराठी भाषेचाच एक प्रकार किंवा उपबोली मानली जाते.

कातकरी किंवा कथोडी ही एक भारतीय भाषा आहे, ज्याचे मराठी भाषेसोबत वर्गीकरण केले जाते. हे भाषा धोक्यात आले आहे, आणि काही टक्के काथोडी लोकंच ही भाषा बोलू शकतात. कातकरी लोक प्रामुख्याने महाराष्ट्रात राहतात. या बोलीभाषेची काही प्रमुख वैशिष्टय़े आहेत. ही भाषा मुख्यत्वे मौखिक परंपरेवर आधारित आहे. कातकरी समाजातील लोक एकमेकांशी संवाद साधताना या भाषेचा वापर करतात. मात्र त्याशिवाय इतरांशी बोलताना हे लोक प्रामुख्याने मराठीचा वापर करतात. अनेक कातकरी मंडळी द्विभाषिक असतात. ही भाषा मुख्यत्वे रायगड (पेण, खालापूर, कर्जत, महाड), ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या जिह्यांमध्ये प्रामुख्याने बोलली जाते.

कातकरी भाषा ही प्रामुख्याने मौखिक स्वरूपात असल्याने तिचे लिखित साहित्य खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे. आधुनिकतेच्या प्रभावामुळे ही बोलीभाषा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि ती धोक्यात आलेल्या भाषांच्या यादीत मोडते.

गेल्या काही वर्षांत या बोलीच्या जतनासाठी प्रयत्न केले जात आहेत. शिक्षण विभागाद्वारे कातकरी मुलांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून त्यांच्या बोलीभाषेचा वापर करून ‘मराठी-कातकरी शब्दकोश’ आणि ‘शिक्षक मार्गदर्शिका’ तयार करण्यात आल्या आहेत.

कातकरी समाजातील लोकगीते बोलींमुळे लयबद्ध असतात.

नको आमाला गोर गोर साऱ्या गो,

आमच्या नवाऱ्या साऱ्या बऱ्या गो,

नको आमाला लाली पावडरी गो,

आमचा केसांचा अंबारा बरा गो,

या गीतात बोलीत ‘ल’ ऐवजी ‘र’ वापरलेले दिसते. याचप्रमाणे येथे ऐवजी येतात, चिमणी ऐवजी चिडू, फुलपाखराऐवजी भिंगरूट हे शब्द दिसून येतात.

आधुनिकीकरणामुळे या बोलीविषयी कातकरी समाजात न्यूनगंड आहे. या बोली म्हणजे आपला वारसा असून त्यांचे जतन झाले पाहिजे.