एलपीजी, रेल्वे आणि आधारकार्डमध्ये 1 जुलैपासून मोठे बदल होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लवकरच जुलै महिना सुरू होईल. प्रत्येक महिन्याप्रमाणे जुलै महिना आपल्यासोबत काही बदल घेऊन येणार आहे. या छोटय़ा-मोठय़ा बदलांचा देशातील सर्व नागरिकांवर परिणाम होऊ शकतो. इतकेच नाही, तर काही बदलांमुळे सर्वसामान्यांच्या खिशावरचा भारही वाढू शकतो.

एलपीजीच्या किमतीकडे लक्ष

पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतात एलपीजी सिलिंडरच्या किमती आधीच लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत. जून महिन्यातही व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात 53.50 रुपयांची वाढ झालेली, तर 1 जुलैपासून एलपीजी सिलिंडरच्या दरात बदल होण्याची शक्यता असून यामुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट बिघडू शकते.

आयटीआर 31 जुलैपर्यंत

आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. ज्यांचे उत्पन्न पगार, घरमालमत्ता, भांडवली नफा किंवा इतर गैरव्यावसायिक स्रोतांमधून मिळते आणि ज्यांच्या खात्यांचे ऑडिट आवश्यक नाही, अशा करदात्यांनी आयटीआर-1 किंवा आयटीआर-2 फॉर्म भरावा. ज्या करदात्यांना आयकर विभागाने तिमाही आधारावर टीडीएस जमा करण्याची परवानगी दिली आहे, त्यांच्यासाठी एप्रिल-जून तिमाहीचा टीडीएस भरण्याची अंतिम तारीख 7 जुलै असेल.

आधारकार्ड

यूआयडीएआयच्या नियमांनुसार सध्या आधारमध्ये तुमचा ई-मेल आयडी अपडेट करण्यासाठी जीएसटीसह 75 रुपये शुल्क आकारले जात आहे, पण 1 जुलै 2026 ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत आधार मोबाईल अॅपद्वारे तुमचा ई-मेल अॅड्रेस अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, म्हणजेच ही सेवा या कालावधीत पूर्णपणे मोफत असेल.

क्रेडिट कार्ड

एचडीएफसी बँकेने आपल्या रेगालिया गोल्ड आणि डायनर्स क्लब प्रिव्हिलेज क्रेडिट कार्डांच्या अटींमध्ये सुधारणा केली आहे. काही बदल आधीच लागू करण्यात आले आहेत, तर विमानतळ लाऊंज प्रवेशासंबंधीचे नवीन नियम 1 जुलै 2026 पासून लागू होतील. एसबीआय कार्डने आपल्या फोनपे एसबीआय कार्ड पर्पल आणि फोनपे एसबीआय कार्ड सिलेक्ट ब्लॅक व्रेडिट कार्डांच्या अटींमध्येही सुधारणा केली आहे.

फुकट्यांविरोधात दुप्पट दंड

1 जुलैपासून भारतीय रेल्वे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करणार आहे. विनातिकीट प्रवास केल्यास किमान दंड 250 रुपयांवरून 500 रुपये केला जाणार. महिलांसाठी राखीव डब्यात प्रवास करणाऱ्या पुरुष प्रवाशांना 2,500 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. दुसऱ्याच्या तिकिटावर प्रवास केल्यास अधिक दंड भरावा लागू शकतो. जनरल तिकीट घेऊन स्लीपर डब्यात प्रवास करणाऱयांवरही कडक कारवाई होणार. परवानगीशिवाय वस्तू विक्री, रेल्वेत भीक मागणे, मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणे, रेल्वे परिसरात अनधिकृत प्रवेश यावरही दंड आकारला जाणार आहे.