गाझात मुलांच्या संहारावर मोदी सरकारचे मौन, सोनिया गांधी यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा व खासदार सोनिया गांधी यांनी गाझामध्ये इस्रायलच्या लष्करी कारवाईबाबत मोदी सरकारने घेतलेल्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. गाझामध्ये पॅलेस्टिनी नागरिकांचे अस्तित्व संपवण्यासाठी इस्रायलकडून लहान मुलांना लक्ष्य करण्यात येत असल्याचा अहवाल संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. एवढ्या गंभीर अहवालानंतरही मोदी सरकार गप्प आहे. या विषयावर मौन बाळगणारा भारत हा एकमेव देश असल्याची टीका सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर केली.

सोनिया गांधी यांनी गाझामधील परिस्थितीवर लक्ष वेधणारा एक लेख लिहिला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, गाझासंदर्भातील आयोगाचे नेतृत्व भारताचे माजी न्यायाधीश एस. मुरलीधर करत आहेत. त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, गाझामध्ये आतापर्यंत २० हजारांपेक्षा जास्त मुलांचा मृत्यू झाला आहे. या अहवालावर मोदी सरकारने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. जग इस्रायलपासून लांब जात असताना भारत इस्रायलच्या जवळ जात आहे.