
>> नवनाथ शिंदे
हिंदुस्थानातील प्रत्येक धर्माच्या विवाह पद्धतीने नात्यांमधील दुवा अधिक मजबूत केला आहे. मात्र, अलीकडे वाढत्या सोशल मीडियाचा प्रभाव नवतरुणाईला (जेन-झी) वाहवत नेत असल्याचे दिसून आले आहे. गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड, विवाहपूर्व संबंधाने थेट निरपराधांचा जीव घेण्याच्या घटनांनी नात्याला कलंकित केले आहे. पाश्चात्य देशांतील हत्येची क्रूरता, हिंसा आता खेडोपाडी पोहोचली आहे. विशेषतः वाढता ताणतणाव सामाजिक घडी विस्कटण्यास कारणीभूत ठरला आहे. सिया चेतनच्या जोडीने मार्गातील काटा काढण्यासाठी तरुणाला गडावरून ढकलून दिल्यामुळे ‘जेन-झी’ची हैवानियत अधोरेखित झाली आहे.
व्यावसायिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबीयाने जुन्या नात्यांचा आधार घेत परिवाराची सून म्हणून नात्यातील आणण्यास प्राधान्य दिले. मात्र, होणारी सून आपल्याच मुलाचा काटा काढेल, याची भणकही ‘जेन-झी’मध्ये असलेल्या २० वर्षीय मुलीने कुटुंबीयांना लागू दिली नाही. लग्न ठरल्यानंतर तिने होणाऱ्या पतीला ट्रेकिंगच्या बहाण्याने लोहगडावर नेले. प्रेमात गुरफटल्यामुळे तिला नात्याचे, समाजाचेही भान राहिले नाही. लग्न मोडून बदनामी करण्यापेक्षा होणाऱ्या नवऱ्यालाच जीवे मारण्याचा डाव बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडने कॉफी पीत रचला. ठरल्याप्रमाणे १८ जूनला तिने तरुणाला लोहगडावर नेले. त्याठिकाणी सेल्फी, व्हिडीओज् काढून होणाऱ्या नक्ऱ्यावर दिखाऊ प्रेम केले. संधी मिळताच, बॉयफ्रेंडच्या मदतीने ४०० फूट खोल दरीत ढकलून देऊन दोघांनी तरुणाचा खून केला.
पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड चर्चेत असून, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी तरुणीने होणाऱ्या नक्ऱ्याचा गडावरून ढकलून देऊन खून केला. याप्रकरणी तपासात नवनवीन खुलासे होत असून, आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी १७ जूनला कॅफेत केतनच्या हत्येचा प्लॅन, कोडवर्ड, लोहगडाच्या रेकीची चर्चा केली होती. त्यानंतर १८ जूनला आरोपींनी केतनला ढकलून दिले. तत्पूर्वी सियाने प्लॅनप्रमाणे बॉयफ्रेंडला खाली बसल्याचा इशारा करताच केतनला धक्का देण्यास सांगितले होते. त्यानुसार सियाने चक्कर आल्याचा बहाणा करीत खाली बसली असता, चेतनने केतनला धक्का मारून ढकलून दिले.
समुपदेशन आवश्यक
तरुणाईचा सोशल मीडियाचा वापर वाढला असून, मोबाइलमुळे ‘जेन झी’ सुसाट सुटली आहे. बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडमुळे वादविवाद सातत्याने घडत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पालकांसह शालेय संस्था, महाविद्यालय प्रशासन, पोलीस प्रशासनाने मुला-मुलींचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. अन्यथा, वादावादी, मारामारी, अपघातांचे प्रमाण ‘जैसे थे’ राहणार आहे. दरम्यान, किरकोळ कारणांमुळे वाढत्या क्रूरतेने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भांडण, सोशल मीडियामुळे होणारी मैत्री, बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडची किनार, मुलांसोबत कुटुंबाकडून न होणाऱ्या क्रूरतेला खतपाणी घालत आहे. तरुणाईच्या वैचारिक मानसिकतेत वेगाने बदल होत आहे. त्यामुळे भांडणावर वेळीच तोडगा काढणे, मध्यस्थी करणे, समन्वयाची भूमिका बजावण्यासाठी पालकांची जबाबदारी आहे.
सिया-चेतनच्या कृत्याची निंदा; नेटकरीही संतप्त
‘तुला जर लग्न करायचे नव्हते, मग कशाला साखरपुडा केलास, निरापराध तरुणाचा जीव का घेतला, समाजामध्ये अशा लोकांना जगण्याचा अधिकार नाही, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड नव्हे, सैतान,’ अशाप्रकारे आरोपी सिया-चेतनच्या कृत्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियाद्वारेही नेटकऱ्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत विरोध व्यक्त केला आहे. दरम्यान, ‘जेन-झी’मध्ये थेट जीव घेईपर्यंत होणारी हिम्मत वाढतेय कशी, असाही प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी पालकांसह कुटुंबीयालाही दोष दिला जात आहे.

























































