गेल्या 12 वर्षांत भाजप आणि मोदींना विकास नाही सापडला, या बंडू जाधवांना काय मिळणार; संजय राऊत यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या 12 वर्षांत भाजप आणि मोदींना विकास नाही सापडला या बंडू जाधवांना काय मिळणार, अशी टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच गद्दार बंडू जाधव मिंधे आणि भाजपच्या पक्षात बूट चाटायला गेलेत,असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.

परभणीतल्या सभेत संजय राऊत म्हणाले की, जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं का म्हणतात हे मला काल कळालं. काल उद्धव ठाकरे यांचे परभणीच्या वेशीवर आगमन झालं तेव्हा परभणीने गद्दारांविरोधात जो एल्गार केला. या परभणीत एकही गद्दार टिकला नाही, त्यामुळे देशात फक्त परभणीचं. या परभणीत अनेक आंडू पांडू आणि बंडू येऊन गेले, तरी शिवसेना इथेच राहणार, असेही संजय राऊत म्हणाले.

तसेच बंडू जाधव दोन वेळा आमदार आणि तीन वेळा खासदार झाले होते. जवळ जवळ 20 वर्ष हा माणूस सत्तेमध्ये आहे. मला काल रेंगे पाटील यांनी सांगितले की या 20 वर्षात यांनी साधी पिठाची गिरणी नाही आणली हे काय विकास करणार? पंतप्रधान मोदी आणि भाजपला गेली 12 वर्ष विकास सापडला नाही, तुम्हाला काय सापडणार? असे संजय राऊत म्हणाले

हे ऑपरेशन टायगर नव्हे तर त्यांनी ऑपरेशन प्रभू श्रीराम केले आहे. ज्या श्री रामाने यांना सत्ता मिळवून दिली, ज्या श्री रामासाठी अनेक शिवसैनिकांनी बलिदान दिलं. हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांनी हा हिंदुत्वाचा आणि श्रीरामाचा लढा सुरू केला, म्हणून हे रामाचं मंदिर उभं राहिलं. त्या रामाच्या मंदिरातल्या दान पेटीतील 550 कोटी रुपये या भाजपने पळवल्या. हे यांचं हिंदुत्व. आणि त्यांच्या पक्षाते हे बंडू जाधव बूट चाटायला गेले आहेत. तेव्हा या देशात परभणीचा जो लौकिक आहे, की या परभणीत कुणीही गद्दारी केली की, तरी त्या गद्दाराला गाडण्यातच येतं. आणि हा परभणीचा काय विकास करणार? हा काय परभणीचा काय दुबई, सिंगापूर,स्वित्झर्लंड करणार आहे? हा बंडू जाधव दोन हजार कोटींचा मालक आहे असं मला कुणीतरी सांगितलं. शिवसेना या चार अक्षरांमुळे आणि ठाकरे कुटुंबामुळे मिळालेली ही ताकद आहे, असे संजय राऊत म्हणाले.

गद्दार दिसला की त्याला तुडवा हे शिवसेनेचे ऑपरेशन आहे, आणि त्यासाठी कोणत्याही आदेशाची गरज नाही. हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला आदेश आहे. शिवसैनिकांना मी इतकंच सांगेन की परभणी शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचीच राहिल. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात आपल्याला शिवसेनेचा भगवा फडकावयचा आहे. या भागात 4 आमदार निवडून आणण्याची जबाबदारी आपण प्रत्येकाने घेतली तर 2029 साली 100 हून अधिक आमदार निवडून येतील आणि स्वबळावर आपले सरकार येईल. त्यानंतर विकास काय असतो हे बंडू जाधवांना दाखवू, असेही संजय राऊत यांनी यावेळी नमूद केले.