
उत्तर प्रदेशातील कानपूर विमानतळावर एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रशिक्षण विमानाचे इंजिन सुरू असतानाच खाली उतरलेल्या प्रशिक्षणार्थी महिला पायलटला विमानाचा पंखा (प्रोपेलर) लागल्याने ती गंभीर जखमी झाली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या घटनेची गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ‘गार्ग एव्हिएशन’ या फ्लाइंग ट्रेनिंग संस्थेचे ‘Tecnam P2006T’ (VT-NBV) हे दुहेरी इंजिन असलेले प्रशिक्षण विमान कानपूरच्या चकेरी विमानतळावर रात्रीच्या प्रशिक्षणासाठी (Night Flying) वापरले जात होते. या विमानात एक फ्लाईट इन्स्ट्रक्टर (प्रशिक्षक) आणि एक महिला कॅडेट (प्रशिक्षणार्थी पायलट) होते.
विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर, विमानाचे इंजिन चालू असतानाच प्रशिक्षणार्थी पायलट खाली उतरली. त्याचवेळी विमानाच्या फिरत्या प्रोपेलरचा (पंखा) जोराचा फटका तिच्या पाठीला बसला. यात ती गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर कानपूरमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताप्रकरणी डीजीसीए चौकशी सुरू आहे.


























































