अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीर पोलीस अलर्ट मोडवर; यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी १८ ठिकाणी माउंटेन रेस्क्यू टीमचा मेगा मॉक ड्रिल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरनाथ यात्रेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना जम्मू-कश्मीर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर आली आहे. यात्रेकरूंचा प्रवास सुरक्षित आणि निर्विघ्न पार पडावा यासाठी रविवारी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या माउंटेन रेस्क्यू टीमने मेगा मॉक ड्रिलचेआयोजन केले होते. कोणत्याही संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या वेळी किंवा नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी सुरक्षा दलांची तयारी आणि त्यांची त्वरित प्रतिसाद देण्याची क्षमता तपासणे, हा या विशेष सराव मोहिमेचा मुख्य उद्देश होता. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सुरक्षा दलांच्या सज्जतेचा अचूक आढावा घेण्यासाठी यात्रा मार्गावरील एकूण १८ वेगवेगळ्या ठिकाणी हा सराव करण्यात आला. विशेष म्हणजे पहलगाम आणि बालटाल या दोन्ही प्रमुख यात्रा मार्गांवर ही रंगीत तालीम पार पडली. यामध्ये प्रत्यक्ष पवित्र गुंफा, पंजतरणी, शेषनाग आणि चंदनवाडी यांसारख्या अत्यंत संवेदनशील आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक ठिकाणांचा समावेश होता.

नैसर्गिक आपत्ती, अचानक उद्भवलेली वैद्यकीय आणीबाणी, दरड कोसळणे, ढगफुटी किंवा अचानक आलेला पूर आणि इतर संभाव्य संकटांच्या वेळी बचाव कार्याची तयारी या सराव मोहिमेदरम्यान कसून तपासण्यात आली. यावेळी माउंटेन रेस्क्यू टीमने प्रत्यक्ष मदत आणि बचाव कार्य, जखमी यात्रेकरूंना तातडीने सुरक्षित स्थळी हलवणे, दळणवळण आणि संवाद व्यवस्था अबाधित राखणे, अत्याधुनिक बचाव उपकरणांचा वापर आणि आपत्कालीन स्थितीत लोकांना वेगाने बाहेर काढण्याची प्रक्रिया यांचा सराव केला. तसेच यावेळी विविध सुरक्षा आणि मदत यंत्रणांमधील समन्वयही परखून पाहण्यात आला.

दरम्यान, बाबा अमरनाथ यांची ही वार्षिक यात्रा येत्या ३ जुलैपासून सुरू होत असून ती सलग ५७ दिवस चालणार आहे. २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी या यात्रेची अधिकृत सांगता होईल. यात्रेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम करण्यात आली आहे.