होर्मुझची सामुद्रधुनी महिन्याभरात पूर्णपणे खुली होईल, पण…! इराणचा मोठा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

होर्मुझची सामुद्रधुनी लवकरच पुन्हा पूर्णपणे खुली होणार आहे., असे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले. तसेच इराण आणि अमेरिका यांच्यात झालेल्या करारानुसार होर्मुझची सामुद्रधुनी पुढील ३० दिवसांत पुन्हा पूर्णपणे उघडली जाईल आणि ती युद्धापूर्वीच्या स्थितीत परत येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी महत्त्वाचा इशाराही दिला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे इराणच्या नियंत्रणाखाली असेल आणि कोणताही बाह्य हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असा कठोर इशाराही त्यांनी दिला आहे.

बगदादमध्ये इराकी परराष्ट्र मंत्री फुआद हुसेन यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अराघची यांनी सांगितले की, इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सर्व अडथळे दूर करेल. त्यांनी असेही सांगितले की, होर्मुझच्या सामुद्रधुनीचे व्यवस्थापन पूर्णपणे इराणने स्थापित केलेल्या प्रणालीअंतर्गत असेल. यासाठी योग्य त्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत आणि त्यांची अंमलबजावणी केली जात आहे. याची संपूर्ण जबाबदारी इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणची आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात झालेल्या करारानुसार, इतर कोणतीही संस्था किंवा देश यासाठी जबाबदार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनात कोणत्याही बाहेरील देशाने किंवा संस्थेने हस्तक्षेप करण्यासंबधात कठोर इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अशा कोणत्याही हस्तक्षेपामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यास विलंब होईल आणि या प्रदेशातील तणाव आणखी वाढेल.

अराघची म्हणाले, गेल्या काही दिवसात होर्मुझच्या सामुद्रधुनीतील घटनांमुळे तणाव आणि संघर्ष वाढला आहे. मी सर्व पक्षांना आवाहन करतो की त्यांनी होर्मुझच्या व्यवस्थापनात किंवा ते पुन्हा सुरू करण्याच्या इराणच्या व्यवस्थेत हस्तक्षेप करू नये. त्यांनी स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य कराराचे पालन केले पाहिजे आणि त्याला त्याच्या नियोजित मार्गापासून विचलित होऊ देऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.

पत्रकार परिषदेत, अराघची यांनी लेबनॉनवरील इस्रायली हल्ल्यांचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की सामंजस्य कराराच्या कलम १ नुसार, लेबनॉनसह सर्व आघाड्यांवर युद्ध संपले पाहिजे. तथापि, इस्रायली सरकार आपले हल्ले सुरूच ठेवत असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सामंजस्य करारामध्ये केलेल्या वचनबद्धतेनुसार, अमेरिकन सरकारची ही जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या बाजूचे आणि झिओनिस्ट राजवटीचे (इस्रायलचे) हल्ले थांबवावेत, तेथील युद्ध समाप्तीची पूर्ण अंमलबजावणी सुनिश्चित करावी आणि ताब्यात घेतलेल्या प्रदेशातून माघार घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.