सगळी थोतांड बंद करा, स्वतःची पाप झाकायला तुम्ही तिकडे गेलात; उद्धव ठाकरे यांनी गद्दारांना सोलून काढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या दोन दिवसांच्या विदर्भ आणि मराठवड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याला आणि उद्धव ठाकरेंच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. धारशिव येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी गद्दारांची आणि भाजपची सालटी काढली. तसेच गद्दार विकास निधीसाठी गेले नाहीत, ते स्वतःच्या स्वार्थासाठी गेले आहेत. त्यामुळे ही गद्दारीची कीड गाडावीच लागेल, हाच महाराष्ट्रधर्म आहे, असे त्यांनी ठणकावले. तसेच राम मंदिर देणगीपासून ते शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत त्यांनी परखड मत व्यक्त केले.

कालपासून महाराष्ट्रामध्ये फिरतोय. सध्या राज्यात काय चित्र आहे, ते आपण सगळे बघतोय. काहीजण म्हणतात उद्धव ठाकरे फिरत नाहीत, पण उद्धव ठाकरे फिरायला लागल्यावर काय होतंय, हे गेले दोन दिवस महाराष्ट्र बघतोय. उद्धव ठाकरे कधीही जबाबदारी टाळणारा नाही, आता उद्धव ठाकरे फिरायला लागला आहे, त्यामुळे गद्दारांचे नेतृत्व करणाऱ्याचे नशिब फिरल्याशिवाय राहणार नाही.

काल यवतमाळ, वाशिममध्ये होतो, आज सकाळी पत्रकारांना भेटलो, त्यांनी सांगितले तुमच्या सभा जोरदार सुरू आहेत. त्यांना म्हटले, या सभा नाहीत, या माझ्या कौटुंबिक भेटी आहेत. सगळे माजे कुटुंबिय आहेत, त्यांना भेटण्यासाठी, धीर देण्यासाठी आलो आहे. आता आपण धाराशिवला आणि महाराष्ट्राला सांगतोय, त्यांनी कितीही गद्दार फोडू देत, पण त्यांच्या उरावर भगवा रोवल्याशिवाय उद्धव ठाकरे शांत बसणार नाही. आपले कट्टर, निष्ठावंत राजाभाऊ वाजे यांना मानले पाहिजे. तसेच अरविंद सावंत यांचेही कौतुक आहे. ते केंद्रामध्ये मंत्री होते. भाजपने दगा दिला. त्यावेळी त्यांना फोन करून सांगितले, भाजपने दगा दिला आहे. त्यांनी एकही प्रश्न केला नाही. त्यांनी लगेच मोदींसमोर जात राजीनामा दिला. तसेच अनिल देसाई यांच्यासमोर 2014 मध्ये मंत्रीपदाचे पान वाढले होते. त्यावेळीही भाजपने दगाबाजी केली आणि समोर दिसत असलेले मंत्रीपद नाकारून अनिल देसाई परत आलेत. संजय राऊत यांच्या नादी कोणी लागण्याचा प्रश्नच नाही. गद्दार शिरोमण्याने 2022 मध्ये जेव्हा आपल्याला फोडाफोडीच्या राजकारणात गुंतवले, तेव्हा सर्वांना गाड्यांमध्ये बसवून गुजरातला त्यांच्या माहेरी नेत होते. तेव्हा कैलास यांनी आपल्याला फोन केला आणि सांगितले, ते कुठे नेताहेत, ते माहिती नाही. मला जायचे नाही आणि संधी साधून ते पळून आले. किती किलोमीटरची त्यांनी पायपाट केली ते त्यांनाच माहिती. त्यावेळी आपण मुख्यमंत्री होतो, गाडीची व्यवस्था करून आपण त्यांना परत आणले. त्यावेळीही कैलास यांना सर्व वैभव ,खोक्यांच्या राशी नाकारून परत आले आहे. तसेच प्रवीण स्वामी यांचेही आहे. ही जिवाला जीव देणारी खरी माणसे आहेत. हे भाग्यात असावे लागते. नुसता विकास निधी, काय करायचे त्याचे, पैशांचा ढीग आहे, पण प्रेम नाही. आम्हाला हरामाचा एकही पैसा नकोय, ज्यांना हरामाचा पैसा हवा होता, तो तिथे गेलाय, तो गद्दार झालाय. इथे मेहनत करून पैसा कमवणारा माझा निष्ठावंत शिवसैनिक आहे.

याआधी इथे सभेला आलो असताना सभा संपल्यावर एक साधा शेतकरी बटवा घेऊन आला आणि म्हणाला त्याला निधी द्यायचाय. आता शेतकरी त्याचे मेहनतीचे पैसे देत होता. केवढे प्रेम होते, त्या एकेका पैशामध्ये. त्या एकेका पैशाला त्यांच्या हजार कोटींची किंमत होती. ओमच भाषणात म्हणत होता, आपण खंडोजी खोपडेचे नाव घेतल्यावर काय म्हणतो? सूर्याजी पिसाळचे नाव घेतल्यावर काय म्हणतो? 400 वर्षे झाली, त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा डाग पुसला जात नाही, तर हे केव्हा पुसणार हा डाग? वाघाचे कातडे पाघंरलेला हा लांडगा होता, ते आता आपल्याला समजले आहे. आपण कोणाला पोसले होतो असा प्रश्न आपल्याला पडलाय. त्यांची प्रकरणे आपल्याला आधी समजली असती तर आपण त्यांना उमेदवारीच दिली नसती.

पूरपरिस्थितीत आपण इथे आलो होतो, शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो होतो. त्यावेळी उद्धव ठाकरे फिरत नाहीत, असे म्हणणारे गद्दार कुढे होतो? त्याचवेळी आपण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी केली होती. आपण जाहीर केलेली कर्जमुक्ती प्रत्येकाला मिळाली होती. आता ते म्हणत आहेत, कर्जमाफी. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, अन्नदात्यांची कर्जमुक्ती करायची असेत. आताची कर्जमाफी कोणाला मिळाली आहे. पीकविमा कोणाला मिळाला आहे. खतांचा तर पत्ताच नाही. शेतकऱ्यांचे वाटोळं करणाऱ्या सरकारला मदत करण्यासाठी तो गद्दार तिथे गेला. असा उमेदवार दिल्याचा आपल्याला खेद आहे.

ते त्यांच्या विमानांचे फोटो शेअर करत आहेत. कुठून आणला हा पैसा. मोदी सांगत आहेत, सोने खरेदी करू नका, खासदार खरेदी करा. त्यामुळे हे वाटते तवेढे सोपे षडयंत्र नाही. त्यांचे बहुमत आहे तर कशाला ही फोडाफोडी सुरू आहे. बहुमत असतानाही उद्धव ठाकरेचा पक्ष, चिन्ह पळवले. तरीही आपण नवे चिन्ह घेत त्यांच्या उरावर हक्काचे 9 खासदार बसवले होते. मोदींचा चेहरा आपण वापरला नव्हता, मी माझ्या वडिलांचा चेहरा वापरला होता. दुसऱ्यांचे बाप चोरणारे लोकं जो निवडून आला त्याला विकत घेत आहेत. ही राजकारणातील बिनबापाची अवलाद, ही गद्दारीची कीड आपल्याला गाडायची आहे. हाच महाराष्ट्रधर्म आहे. ही गद्दारी आई भवानीच्या जिल्ह्यात झाली आहे.

तुम्ही जी तलवार दिली. त्याच तलवारीने मोघलांशी टक्कर घेणारे आमचे छत्रपती शिवराय होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला असता, मोघलांची ताकद एवढी आहे. माझ्याकडे निधी नाही आहे. तर आज आपण राहिलो असतो का? मोघलांच्या ताकदीसमोर स्वाभीमान आणि स्वराज्याचे स्वप्न होते. आम्ही गुलामगिरी करणार नाही, याच भावनेतून आपले दैवत उभे राहिले. भवानी मातेच आर्शिवाद घेत ते मोघलांसमोर उभे राहिले. स्वराज्याची स्थापना केली म्हणून ते आपले दैवत आहे. त्यामुळे त्यांनी विकास निधीचा रट्टा लावला आहे. तो विकास निधी नसून त्यांच्या स्वार्थासाठी आहे. आता त्यांचे घोटाळे उघड होत आहेत. त्यावर बोलायचे झाल्यास वेगळी सभा घ्यावी लागेल.

आपण खासदारांची बैठक घेतली, तेव्हा यांनी अनेक कारणे दिली. त्यांनी सांगितले, माझ्या मुलगा रुग्णालयात आहे. आपण सांगितले, नका येऊ. त्याचेवेळी व्हीडीओ कॉलमध्ये त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. तेव्हाच आपल्या मनात शंका आली. आपण त्याला जपण्याचा प्रयत्न केला. कैलास आणि वरूणला त्यांना भेटायला पाठवले होते. तेव्हा मी त्याला म्हणालो, मला ओमराजे हवाय, त्यांना खासदार हवा आहे. निर्णय तू घे. आता हे सर्व समजल्यावर कळते की तो माणूस म्हणण्याच्या लायकीचा नाही. आपण हे व्रत घेऊन पुढे जात आहोत. माझ्या शेतकऱ्याला हमीभाव मिळाला पाहिजे. पीकविमा मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनात मी किंवा आदित्य येणार आहोत. शेतकऱ्यांच्या लढ्यात आम्ही उतरल्याशिवाय राहणार नाही. कालच्या हिंगोलीच्या बैठकीमध्ये सुद्धा काही शेतकरी आले होते. शक्तिपीठ महामार्ग जातोय तो आमच्या शेतीची संपूर्ण वाट लावून जातोय. शेतीची वाट लावणारच कारण भाजपला आता कॉन्ट्रॅक्टर फार मोलाचे झालेले आहेत.

मला याही गोष्टीची लाज वाटते की ज्या भाजपचे देशात फक्त दोन खासदार होते, त्या भाजपला आपण बोट धरून महाराष्ट्रमध्ये मोठा केला आणि बाबरीचा जो काही लढा उभारला होता त्याच्यामध्ये शिवसेना प्रमुखांनी सगळं जे काही पाडण्याचं काम होतं भाजपवाले म्हणाले होते की आम्ही नाही केले हे काम तेव्हा शिवसेनाप्रमुख म्हणाले होते की जर हे काम माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर त्या शिवसैनिकांचा मला गर्व आहे. पण आता लक्षात येतय जे भाजपवाले बेंबीच्या देठापासून बोंबलत होते की मंदिर वही बनायंगे मंदिर वही बनायंगे, आता गेल्या चार दिवसात त्याही बातम्या येत आहेत की त्या मंदिराची लूट चाललेली आहे. चांदीच्या विटा गायब झाल्यात, लोकांनी दान दिलेले गायब झाले आहे. त्या काळात स्वतः शिवसेनाप्रमुख सगळीकडे फिरले होते शिलापूजन केलं होतं. पूर्ण भारावून टाकणार वातावरण देशामध्ये झालं, हिंदुत्वाच वातावरण निर्माण झालं आणि त्या हिंदुत्वाच्या वातावरणाचा गैरफायदा घेत भाजपवाले तिकडे सत्तेवरती आले आणि राम मंदिर बांधलं गेलं राम मंदिर बांधल्यानंतर आता जी लूट चाललेली आहे ही लूट बघितल्यानंतर मला असं वाटतं की आता त्यांच आधीच नाव होत भारतीय जनता पक्ष आता ज्या बाबराने राम जन्मभूमीच्या ठिकाणी मशीद बांधली होती आता हे ते राम मंदिर लुटतायत म्हणजे बीजेपी म्हणजे बाबरी बाबर जनता पार्टी झालेली आहे. आता ही बाबर जनता पार्टी झाली आहे. सगळी फसवणूक चालली आहे, म्हणून लक्षात आपण कशाला सामोरे जातोय या गद्दाराची हिंमत आहे उद्या लोकसभेत गेल्यानंतर राम मंदिर लुटणाऱ्यांना शिक्षा का दिली जात नाही हे विचारण्याचे धाडस हा गद्दार करू शकणार आहे का? जे धाडस आपले शिवसेनेचे खासदार काढतील हे धाडस या सहा पैकी एकातरी गद्दाराच्या अंगामध्ये आहे का? बाकीच्या भाजप वाल्यांच तर सोडूनच द्या मी सकाळी सांगितलं तेच परत सांगतोय की ही शिवसेना का फोडतायत कारण त्यांना महाराष्ट्र धर्म संपवायचा आहे. त्यांना मराठी माणसाची अस्मिता संपवायची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रक्तामध्ये स्वाभिमान भिनवलेला आहे देशप्रेम भिनवलेला ते यांना पुसून टाकायचे आहे.

आता राज्यात राहिलेलं सुद्धा यांना गुजरातला न्यायचं आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला हा सुद्धा आपला एक प्रचाराचा मुद्दा होता गेल्या दहा वर्षांमध्ये इकडे या धाराशीमध्ये किती कारखाने आले, एक तरी कंपनी आले सगळं काही गुजरातमध्ये नेले. नाशिकचा कुंभमेळा होतोय, त्या कुंभमेळ्याचे कॉन्ट्रॅक्टसुद्धा गुजराती लोकांना देऊन टाकली आहे. महाराष्ट्रमध्ये एकही स्वाभिमानी त्यांना शिल्लक ठेवायचा नाही. स्वाभिमान केव्हा संपेल जेव्हा शिवसेना संपेल जेव्हा ठाकरे संपेल तेव्हा त्यांना इकडे मुक्तद्वार मिळेल म्हणून ते एवढं करून सुद्धा ठाकरे संपत का नाही त्याच्यासाठी फोडाफोडी चाललेली आहे. ठाकरे का नाही संपत कारण ठाकरे संपू शकत नाही. हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख जोपर्यंत महाराष्ट्राच्या हृदया- हृदयामध्ये आहेत तोपर्यंत ठाकरे तुमच्या किती पिढ्या उतरल्या तरी संपणार नाही.

इतके वर्ष होऊन एवढी फोडाफोडी करून सुद्धा का परत शिवसेना संपवायवी लागतेय. आमदार फोडले शिवसेना संपली नाही, नऊ खासदार आले परत त्यातले सहा फोडले शिवसेना संपली नाही. ही खरी शिवसेना आहे बाळासाहेबांची शिवसेना आमदार खासदारांच्या संख्येमध्ये मोजता येत नाही, ती घराघरामध्ये पोहोचलेली आणि प्रत्येकाच्या मनामनामध्ये आणि हृदयामध्ये घर करून बसलेली आहे.

दोन दिवसापूर्वी आपले दोन खासदार जाऊन ओम बिर्लांना जाऊन भेटून आलेले आहेत त्यांना घटनेचे एक पुस्तक दाखवले. त्याच्यामधला तो नियम दाखवलेला आहे. आता ते जे काय म्हणतायत सहा झाले नऊ पैकी सहा म्हणजे टू थर्ड झाले आणि माझ्या कानावर जे आलं की यांच आधीच ठरलं होतं फक्त हा इथला जरा आडून बसला होता कारण त्याला माहिती आहे माहिती होतं पाच झालेत सहा होईपर्यंत टू थर्ड होत नाही म्हणून ताणून धरलं भाव वाढवला आणि मग गेला भाव वाढून घेतला पण टू थर्ड गेले तरी काही होत नाही, फुटू शकत नाहीत कारण कायद्यामध्ये जे लिहिले घटनेमध्ये जे लिहिलेल आहे की दोन तृतींश संख्येने जरी इकडन तिकडे गेले तरी ते पक्षांतर करू शकत नाही. पक्षात विलीन होऊ शकत नाहीत पक्षात विलीन होण्याचा निर्णय हा पक्ष पक्षानी घ्यावा लागतो आणि त्याला दोन तृतीशनी पाठिंबा द्यावा लागतो. आता बघूया ओम बिर्ला काय करतायत.

लोकसभेच्या वेळेला जे आम्ही सांगत होतो आणि म्हणून तुम्ही ऐकून आपला हक्काचा खासदार निवडून दिला यांना दोन तृतीयांश बहुमत पाहिजे. अबकीबार 400 पार कारण यांना घटना पायदडी तुडवायची होती. आता सुद्धा दोन तृतीयांश बहुमत करून काही घटनेमध्ये बदल करता येतात का ते त्यांना पाहायचे म्हणून दोन तृतीयांश बहुमत पाहिजे मग उद्धव ठाकरेना पक्ष जपता आला नाही, ममता बॅनर्जीचा पक्ष कसा फुटला, अरविंद केजरीवालांचा कसा फुटला, काय आम्ही सगळे घरात बसलो होतो. ममता बॅनर्जी तर रस्त्यावरती उतरून लढत होत्या पण एका महिलेला म्हणजे महाराष्ट्रमध्ये लाडकी बहिण योजना दिली त्याच्यानुसार मत मिळवली पण एक वाघीण ममता बॅनर्जी रस्त्यावरती उतरल्यानंतर अडीच लाखापेक्षा जास्त फौज सीमा सुरक्षा दल त्या बंगालमध्ये घुसवून यांना निवडणूक जिंकावी लागली. हे यांच शौर्य, तुम्ही बंगालमध्ये निवडणूक जिंकायला म्हणून सैन्याचा वापर करताय? जळत्या मणिपूरमध्ये कोणी जात नाही. मणिपूरमध्ये सैन्य जात नाही. पाकव्याप्त काश्मीरमध्ये अजूनही हे पाऊल टाकायला घाबरतायत. अरे फौज घुसवा आणि पाकव्याप्त कश्मीर आपल्यात आणा. मी तुम्हाला पहिला पाठिंबा द्यायला तयार आहे कशाला पाहिजेत गद्दार? देशासाठी काम करा मी तुम्हाला पाठिंबा देतो, घुसवा पाकव्याप्त काश्मीर मध्ये फौज, आणा तो पाकव्याप्त काश्मीर माझ्या भारतामध्ये. हिम्मत असेल तर पण याच्यापैकी काहीच करायचं नाही आहे.

आमचं हिंदुत्व वेगळ आहे, आम्हीसुद्धा प्रभू रामचंद्राला मानतो तस आई तुळजाभवानीला मानतो, आम्हीसुद्धा जय श्रीराम बोलतो. आमच्या हृदयात राम हाताला काम आणि शेतकऱ्याच्या मालाला दाम हे आमच हिंदुत्व आहे. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणार हिंदुत्व असलं पाहिजे. रामाच जर काय जयघोष करणार असाल तर रामराज्य काय होतं त्याचे पुरावे काढा आणि रामराज्य आपल्या देशामध्ये आणून दाखवा.

निधी मिळत नाही मग गेले रावणाकडे. ही सगळी थोतांड बंद करा, स्वतःची पाप झाकायला तुम्ही तिकडे गेलात, गद्दारी केलेली आहे आणि स्वतःचा निधी खाजगी निधी वाढून मिळण्यासाठी म्हणून तुम्ही गेलात. हा आमच्या सगळ्या धारावीकरांचा नाही तर महाराष्ट्राचा आरोप आहे. हे आतापर्यंत भावनेच गणित खूप झालं. दुर्दैवाने या गद्दारांनी आपलं सरकार पाडलं नसतं तर जे मी माझ्या पहिल्या मुख्यमंत्री काळाच्या पहिल्या वर्षी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती. कदाचित आणखीन एकदा मी पाचव्या वर्षी सुद्धा केली असती. कारण मला जाणीव आहे कोरोनामध्ये संपूर्ण अर्थचक्र बंद पडलेला असताना महाराष्ट्राचा अर्थचक्र जर कोणी चालू ठेवल असेल तर ते माझ्या अन्नदात्या शेतकऱ्यांनी चालू ठेवलेले आहे. संपूर्ण जग लॉकडाऊन मध्ये होतं वर्क फ्रॉम होम पण शेतकरी जर का वर्क फ्रॉम होम करत बसला असता तर आपण भुकेने मेलो असतो.

वरवर वाटलं तर शिवसेनेचे खासदार यांनी फोडलेत पण एक प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारून बघा ज्या गटामध्ये गेलेत, मिंधे सेनेमध्ये, गुलाम सेनेत गेलेत त्या गुलामांचे काय भवितव्य आहे का? भवितव्यच नाहीये कारण वापरा आणि फेका ही भाजपची नीती आहे. सहा खासदार भाजपामध्ये का नाही गेले प्रश्न कोणाला पडलाय प्रश्नाच उत्तर आहे कारण हे भाजपातल्या अंतर्गत जी गटबाजीत आहे. हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस चालू आहे. कदाचित देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्याची खुर्ची सुद्धा गेली तर मला नवल नाही वाटणार, हे मोठं कटकारस्थान सुरू आहे. प्रत्येक गोष्टीला एक शेवट असतो याच्यानंतर कोण त्याच्यानंतर कोण तस दिल्लीत सुद्धा सुरू झाले की आता बाबा जे बसले त्यांच्यानंतर कोण? आणि मग त्यांच्यात जी काही रस्सीखेच सुरू आहे. जे पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये आहेत त्या सगळ्यांचा पत्ता 29 पर्यंत कट होतोय की नाही हे तुम्ही बघा.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते शिवराज सिंग चव्हाण त्यांच्या चेहऱ्यावरती मध्यप्रदेशची निवडणूक भाजपा जिंकली होती. आता मामाच नावच नाही कोण घेत कारण का कदाचित मामा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले असते, एवढे शिवराज चव्हाण हे तिथले लोकप्रिय नेते होते. त्याच्याआधी नितीन गडकरी आपल्या महाराष्ट्रातला मराठी माणूस भाजपचे अध्यक्ष होते. दुसरी टर्म त्यांना मिळत होती. त्यावेळी त्यांच्या भानगडी काढल्या गेल्या आणि त्यांना फेकून दिलं. ते परत अध्यक्ष झाले तर संघ यांना पंतप्रधानपदी बसवेल, संघाचा पाठिंबा गडकरीना होता आणि गडकरी पंतप्रधान होऊ नयेत म्हणून गडकरींचे पंख छाटले गेले. आता तेच परत देवेंद्र फडणवीसांसोबत होऊ शकते. देवेंद्र फडणवीसांना इथल्या इथे संपवण्यासाठी ही गद्दारी केली जाते आणि डायरेक्ट देवेंद्र फडणवीसांकडे खासदार देण्यापेक्षा बाजूला ठेवलेत की जेव्हा माझं नाव येईल तेव्हा ते देवेंद्र फडणवीसला पाठिंबा देणार नाहीत मला देतील अशी ही चाल आहे.

हा महाराष्ट्रवरती पुन्हा एकदा आघात होणार आहे. त्याविरोधात आम्ही तर लढूच आम्ही नुसते लढणार नाही आम्ही तुम्ही गद्दारी करवताय आम्ही तुम्हाला संपवणार म्हणजे संपवणारच. त्यामुळे मला धाराशिवच्या खासदाराची चिंता नाही. आमदारकीची चिंता नाही. तुम्ही आहात तोपर्यंत मी निश्चिंत आहे मी तुमच्या भरोशावर आहे मी तुमच्या विश्वासावरती आहे पण शिवसेनेचे जे सहा खासदार फोडले गेले आहेत ती चिंता जर का कोणाला वाटायला पाहिजे असेल तर ती देवेंद्र फडवणीसांना वाटली पाहिजे. कारण गद्दाराचा गट हा भाजपच्या खासदारांपेक्षा आज जास्त मोठा झालेला आहे. तिकडे तृणमूलचे खासदार सुद्धा फोडले भाजपात नाही घेतले भलत्याच पक्षात दिलेले आहेत त्रिपुरा मधल्या त्या पक्षाच नाव पण माहित नाही अशा पक्षात टाकून दिले. हे जे काही चाललेल आहे हे देशासाठी घातक आहे आणि हे भाजपा अंतर्गत पंतप्रधान पदाच्या खुर्चीसाठी चाललेली फोडाफोडी आहे आणि म्हणूनच तुम्ही सावध राहायचं. मी मुद्दाम तुम्हाला भेटायला आलो दोन गोष्टीसाठी एक तर बाबांनो खरच माझ्याकडन चूक झाली त्याच्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. मी चुकीचा माणूस तुम्हाला दिला. तुम्ही माझ्यावरती भरवसा ठेवून त्याला निवडून दिला आणि आज तो गद्दार निघाला म्हणून मी तुमची माफी मागतो. दुसरा शब्द मी तुम्हाला देतो की मी त्या गद्दारावरती अवलंबून नाही. तुमचं माझं नात थेट आहे किती संकट येऊ द्यात पण जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे हा तुमच्या सोबत आहे आणि तो तुमच्या सोबतच राहील हे एक तुम्हाला वचन देतो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.