FIFA World Cup 2026 – अर्जेंटिना नॉनस्टॉप… मेस्सीचा सहावा प्रहार, अल्जेरिया ऑस्ट्रिया दोघेही बाद फेरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्ल्ड कपच्या साखळी फेरीचा पडदा अखेर पडला आणि ग्रुप ‘जे’मध्ये शेवटच्या दिवशी प्रेक्षकांना थराराचा फुल डोस दिला. एका बाजूला गतविजेता अर्जेटिनाने आपल्या नॉनस्टॉप विजयांची मालिका कायम राखताना जॉर्डनचा ३-१ असा पराभव करत गटातील अव्वल स्थानावर शिक्कामोर्तब केले, तर दुसरीकडे अल्जेरिया आणि ऑस्ट्रिया यांच्यातील ३-३ अशी रंगलेली गोलांची आतषबाजी दोन्ही संघांना बाद फेरीत घेऊन गेली. त्यामुळे ग्रुप ‘जे’मधून अर्जेटिना, अल्जेरिया आणि ऑस्ट्रिया या तिन्ही – संघांनी राऊंड ऑफ ३२ मध्ये प्रवेश केला.

डलासमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात अर्जेटिनाने सुरुवातीपासूनच चेंडूवर वर्चस्व राखले. २४ व्या मिनिटाला जिओव्हानी लो सेल्सोने अचूक फिनिश करत गतविजेत्यांना आघाडी मिळवून दिली. अवघ्या सात मिनिटांनी जॉर्डनच्या बचावपटूकडून पेनल्टी बॉक्समध्ये झालेल्या चुकीचा अर्जेटिनाने पुरेपूर फायदा घेतला. पेनल्टीवर लॉटारो मार्टिनझने कोणतीही चूक न करता चेंडू जाळ्यात धाडला आणि अर्जेंटिनाची आघाडी २-० अशी झाली.

मध्यंतरानंतर जॉर्डनने हार मानली नाही. ५५ व्या मिनिटाला मुसा अल-तमारीने शानदार गोल करत सामना पुन्हा रंगतदार केला, मात्र सिंह जखमी झाला म्हणून तो शिकार सोडत नाही. ८० व्या मिनिटाला लिओनेल मेस्सीने आपल्या खास शैलीत गोल करत अर्जेटिनाचा विजय पक्का केला. या विश्वचषकातील हा त्याचा सहावा गोल ठरला आणि गोल्डन बूटच्या शर्यतीतही त्याने आपली दावेदारी अधिक मजबूत केली. जॉर्डनचा विश्वचषक प्रवास मात्र याच सामन्याने संपुष्टात आला.

सामना बरोबरीमुळे दोघांनाही तिकीट
कॅन्सस सिटीमध्ये मात्र फुटबॉलप्रेमींना अक्षरशः हृदयाचे ठोके वाढवणारा सामना पाहायला मिळाला. ऑस्ट्रियाचा मार्को अर्नाटोविचने २८ व्या मिनिटाला गोल करत सुरुवात केली. पण पहिल्या सत्राच्या अखेरीस राफिक बेलघालीने बरोबरी साधत अल्जेरियाला सामन्यात परत आणले. दुसऱ्या सत्रात मार्सेल साबित्झरने ५५ व्या मिनिटाला ऑस्ट्रियाला पुन्हा आघाडीवर नेले. मग रियाद महरेझने अप्रतिम गोल करत पुन्हा २-२ अशी बरोबरी साधली. सामना संपत असताना इंज्युरी टाइममध्ये तिसऱ्या मिनिटाला महरेझने पुन्हा एकदा गोल करत अल्जेरियाला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली.