
आयएएस व आयपीएस घडवण्यासाठी शिवसेना ठाणे जिल्हा शाखा, आनंद चॅरिटेबल ट्रस्ट व चाणक्य मंडळ परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी मुलांना करियरचा कानमंत्र दिला. तसेच स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी अभ्यास कसा करावा याबाबत खास टिप्सही सांगितल्या. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपला पाया भक्कम केल्यास यश हमखास मिळेल, असा विश्वास माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी दिला.
करियर मार्गदर्शन शिबिरास ठाण्यासह विविध भागांतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराप्रमाणे महाराष्ट्र आणि जगात हिंदुस्तान नंबर एकचा करण्याचे स्वप्न तरुणांनी बघावे, असे आवाहन धर्माधिकारी यांनी केले. शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून भरवलेल्या या शिबिरास चाणक्य मंडळ परिवाराचे विश्वस्त अॅड. सिद्धार्थ धर्माधिकारी यांनीही मार्गदर्शन केले. दहावी, बारावी आणि पदवीनंतर अचूक करियर कसे निवडावे तसेच स्पर्धा परीक्षांची नेमकी तयारी कशी करावी याबाबतचा मोलाचा सल्ला शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी मुलांना दिला.






























































