ठाण्याच्या कॅडबरी जंक्शनवर खाकी इन अ‍ॅक्शन, डीसीपींनी स्वतः कार टोईंग करून ट्रॅफिककोंडी फोडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महामार्गावर एखादे वाहन बंद पडल्यास त्याचा परिणाम ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीवरही होतो. अशीच एक कार रात्री कॅडबरी जंक्शनवर अचानक बंद पडली. घटनेची माहिती मिळताच वाहतूक विभागाचे डीसीपी पंकज शिरसाट यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर स्वतः डीसीपी यांनी ती कार टोईंग करून ट्रॅफिककोंडी फोडली. कॅडबरी जंक्शनवर खाकी इन अॅक्शन पाहायला मिळाल्याने ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या प्रवासी व वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

शहरातील वाहतूककोंडीची अनेक कारणे आहेत. त्यात भररस्त्यात वाहने बंद पडून होणारी कोंडी वाहतूक पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या देवेंद्र सुपेकर यांची कार ठाण्याच्या कॅडबरी उड्डाणपुलावर अचानक बंद पडली. रस्त्याच्या मध्यभागी कार बंद पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्याचवेळी ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट पेट्रोलिंग करत होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्यांनी स्वतः पुढाकार घेत ते रस्त्यावर उतरले. तसेच आपल्या शासकीय वाहनातील टोईंग बेल्ट काढून स्वतः त्या बंद कारला बांधला आणि लगेचच टोईंग करून ती कार उड्डाणपुलाखाली रस्त्याकडेला लावली.

वाहतूक नियंत्रणासाठी ठाणे वाहतूक पोलिसांकडे टोईंग क्रेनचे नियोजन आहेच. त्याचबरोबर १८ युनिटमधील प्रत्येक वाहतूक पोलीस निरीक्षकांच्या पेट्रोलिंग वाहनातदेखील टोईंग बेल्ट उपलब्ध करून दिलेले आहेत.

वाहनांची सर्व्हिसिंग, दुरुस्ती वेळेवर करा

वाहनचालकांनी वेळोवेळी वाहनाची सर्व्हिसिंग करावी, वाहनाची देखभाल आणि दुरुस्ती वेळेवर केल्यास गाड्या रस्त्यात बंद पडणार नाहीत. तरीही अशी घटना घडल्यास वाहनचालकांनी वाहतूक विभागाच्या ८२८६३००३०० / ८२८६४००४०० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे.