टीडीसी बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व, 21 पैकी 16 जागा जिंकल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसी) निवडणुकीत २१ पैकी १६ जागा जिंकून सहकार पॅनेलने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. परिवर्तन पॅनेलला फक्त पाच जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीकडे ठाणे व पालघर जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सहकार क्षेत्रातील ही महत्त्वाची बँक असून बँकेचा अवाढव्य कारभार सांभाळण्याचे मोठे आव्हान नव्या संचालकांपुढे आता आहे.

ठाणे व पालघर जिल्ह्यातील सहकार चळवळीमध्ये टीडीसी बँकेचा मोठा सहभाग असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणे, पतसंस्थांना निधी पुरवणे आणि सामान्य नागरिकांसाठी बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणे, अशी महत्त्वाची कामे या बँकेमार्फत केली जातात. या बँकेचे हजारोंच्या संख्येने सभासद असून पालघर व ठाणे जिल्ह्यातील शेतकरी बँकेवर अवलंबून आहेत. सरकारच्या विविध योजना व शेतीविषयक अनेक आर्थिक उपक्रम या बँकेमार्फत राबवले जातात.

टीडीसी बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी यावेळच्या निवडणुकीत सहकार पॅनेल व परिवर्तन पॅनेल आमने सामने उभे ठाकले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व माजी खासदार कपिल पाटील यांच्या पुढाकाराने परिवर्तन पॅनेलने सहकार पॅनेलसमोर आव्हान उभे केले होते. या निवडणुकीसाठी ठाणे व पालघर जिल्ह्यात अनेक पक्षांचे पदाधिकारी अप्रत्यक्षपणे काम करत होते. २१ जागांपैकी सहकार पॅनेलच्या आठ जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित जागांसाठी शनिवारी मतदान झाले. आज झालेल्या मतमोजणीनंतर सहकार पॅनेलला १६ व परिवर्तन पॅनेलचे ५ उमेदवार निवडून आल्याचे स्पष्ट झाले आहे.

पैसे वाटपाचा बविआने केला होता आरोप

टीडीसी बँकेच्या मतदानाआधी एक दिवस म्हणजे शुक्रवारी विरारमधील भाजपच्या कार्यालयातून पैसे वाटप होत असल्याचा आरोप बविआचे नगरसेवक निषाद चोरघे व प्रशांत राऊत यांनी केला होता. एवढेच नव्हे तर पोलिसांनी कार्यालयावर धाड टाकून ४ लाख ४ हजार रुपयांची २१ पाकिटेदेखील जप्त केली होती. या आरोप-प्रत्यारोपांमुळे बँकेची निवडणूक वादग्रस्त झाली होती.