TET पेपरफुटीप्रकरणी काँग्रेस आक्रमक, शिक्षणमंत्री दादा भुसे यांची गाडी अडवून दाखवले काळे झेंडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीच्या गंभीर प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, काँग्रेसची विद्यार्थी संघटना नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने आज विधानभवन परिसरात शिक्षणमंत्री दादा भुसे यांची गाडी अडवून त्यांना काळे झेंडे दाखवले. यावेळी कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

NSUI महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो विद्यार्थी व कार्यकर्ते विधानभवन परिसरात एकत्र आले होते. शिक्षणमंत्री दादा भुसे विधानभवनातून बाहेर पडत असताना प्रवेशद्वारावर त्यांच्या वाहनाला काळे झेंडे दाखवत आंदोलन करण्यात आले. यावेळी “पेपरचोर सरकार हाय हाय”, “दादा भुसे राजीनामा द्या”, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ बंद करा”, “पेपरफुटी करणाऱ्यांना अटक करा”, “विद्यार्थ्यांना न्याय द्या” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

यावेळी बोलताना NSUI महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे म्हणाले की, राज्यात स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियांमध्ये सातत्याने पेपरफुटीच्या घटना घडत आहेत. लाखो विद्यार्थी दिवस-रात्र अभ्यास करूनही भ्रष्ट व्यवस्थेमुळे त्यांच्या भविष्याशी खेळ केला जात आहे. TET पेपरफुटी ही केवळ प्रशासकीय निष्काळजीपणा नसून विद्यार्थ्यांच्या विश्वासाशी झालेला गंभीर विश्वासघात आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून पेपरफुटीच्या रॅकेटचा पर्दाफाश करावा, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.