
फुटबॉलच्या विश्वात आशिया हा कायम ‘उद्या मोठं काहीतरी करेल’ या आशेवर जगणारा खंड म्हणूनच ओळखला जातो. प्रत्येक वर्ल्ड कपआधी आशियाई चाहते छातीठोकपणे सांगतात, ‘यावेळी इतिहास घडणार!’ मग वर्ल्ड कप संपला की तो इतिहास पुन्हा पुढच्या चार वर्षांसाठी पुढे ढकलला जातो. हेच वर्षानुवर्षे सुरू आहे.
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये तर आशियासाठी सुवर्णसंधी होती. स्पर्धा 32 वरून 48 संघांची झाली. आशियाला तब्बल नऊ जागा मिळाल्या. जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, इराण, सौदी अरेबिया, कतार, इराक, जॉर्डन आणि पदार्पण करणारा उझबेकिस्तान असे नऊ योद्धे रणांगणात उतरले. पण युद्ध मध्यावर आले तेव्हा फक्त दोनच सैनिक उरले होते. एक जपान आणि दुसरा ऑस्ट्रेलिया. बाकी सात जणांचा खेळ पाहून फुटबॉल देवतांनीही कपाळावर हात मारला असावा. 9 संघांनी मिळून साखळीत केवळ 3 सामनेच जिंकले.
सर्वात जास्त वाईट कोणाचं वाटलं माहीत आहे? फिफाचं! त्यांनी 48 संघांचा विश्वचषक केला, आशियाला जादा जागा दिल्या. बहुतेक त्यांना वाटलं असेल, ‘आता आशियातून एखादा वाघ बाहेर येईल.’ पण बाहेर आले ते… पाळीव मांजर. आशियाचा इतिहास मात्र असा नव्हता. 2002 चा विश्वचषक आठवा. दक्षिण कोरियाने इटलीला घरी पाठवलं, स्पेनला रडवलं आणि थेट उपांत्य फेरी गाठली. आजही उपांत्य फेरी गाठणारा तो एकमेव आशियाई संघ आहे. त्या काळात कोरियन खेळाडू मैदानावर धावत नव्हते; ते जणू विजेच्या तारांवरून पळत होते.
जपान हा आशियाचा सर्वात शिस्तबद्ध विद्यार्थी. गृहपाठ वेळेवर, गणवेश इस्त्राीचा आणि खेळातही तसाच. 2002, 2010, 2018, 2022 आणि आता 2026… अशी सलग पाचव्यांदा बाद फेरी गाठण्याची कामगिरी. पण त्यांचंही एक आहे. दारापर्यंत पोहोचतात, बेल वाजवतात आणि परत घरी येतात. उपांत्यपूर्व फेरीचं दार त्यांच्यासाठी अजूनही उघडलेले नाही.
ऑस्ट्रेलिया म्हणजे आशियातला पाहुणा. कालपरवा आशियात आला आणि घरच्यांपेक्षा जास्त गुण घेऊन गेला. 2006, 2022 आणि आता 2026… तीन वेळा बाद फेरी. बाकी आशियाई संघ अजूनही नकाशा पाहत बसले आहेत. 2022 मध्ये आशियाने जगाला थक्क केलं होतं. जपानने जर्मनी आणि स्पेनला नमवलं. दक्षिण कोरियाने पोर्तुगालला धक्का दिला. तेव्हा वाटलं होतं, ‘पूर्वेकडचा सूर्य आता कायम तळपणार.’ पण चार वर्षांत तो सूर्य पुन्हा ढगाआड गेला.
इराण, सौदी अरेबिया, कतार, इराक, जॉर्डन, उझबेकिस्तान आणि दक्षिण कोरिया… या सात संघांनी इतक्या लवकर बॅगा भरल्या की विमानतळावरच्या कर्मचाऱ्यांनाही आश्चर्य वाटलं असेल. वर्ल्ड कपमध्ये ते खेळायला आले होते की पर्यटनाला, असा प्रश्न पडला.
खरं सांगायचं तर युरोपियन संघ फुटबॉलला उद्योग मानतात. दक्षिण अमेरिकन संघ धर्म मानतात. आणि अनेक आशियाई देश अजूनही त्याला सरकारी योजना समजतात. दर चार वर्षांनी थोडा गाजावाजा, मग पुन्हा शांतता. फुटबॉल हा फक्त पायांचा खेळ नाही, तो संस्कृतीचा खेळ आहे. जपान आणि ऑस्ट्रेलियाने युरोपमध्ये खेळाडू घडवले, क्लब संस्कृती मजबूत केली. बाकी अनेकांनी अजूनही स्वप्नांवरच सराव केला. फुटबॉलमध्ये एक गोष्ट नेहमी खरी ठरते. जागा वाढवल्याने गुणवत्ता वाढत नाही. परीक्षेत जास्त विद्यार्थी बसले म्हणून जास्त जण सुवर्णपदक मिळवत नाहीत. त्यासाठी अभ्यासही तितकाच लागतो.
यंदाचा वर्ल्ड कप आशियाला एक कठोर धडा देऊन गेला आहे. नऊ तिकिटं मिळवणं हा अभिमानाचा विषय असू शकतो, पण बाद फेरीत दोनच झेंडे फडकणं हा आत्मपरीक्षणाचा विषय आहे. कारण फुटबॉलच्या रणांगणात इतिहास जागांनी लिहिला जात नाही… तो गुणवत्तेने लिहिला जातो.


























































