
हिंदुस्थानात लवकरच खराब हवामान किंवा कमी दृश्यमानतेमध्येही विमान सुरक्षित उतरवता येतील. प्रथमच थेट सॅटेलाइट सिग्नलच्या मदतीने व्यावसायिक जेट विमान सुरक्षित उतरविण्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. डीजीसीएच्या निरीक्षणाखाली इंडिगो एअरलाईन्सच्या एअरबस 320 विमानाचे उदयपूर विमानतळावर ‘गगन’ या स्वदेशी नेव्हिगेशन यंत्रणेद्वारे ऐतिहासिक लँडिंग करण्यात आली. या यंत्रणेमुळे देशातील विमान वाहतूक अधिक सुरक्षित होणार आहे.
इंडिगोने वर्ष 2022 मध्ये ‘एटीआर’ या लहान विमानांमध्ये ‘गगन’ यंत्रणेची चाचणी घेतली होती. मात्र, मोठय़ा जेट विमानांची ही प्रथमच चाचणी यशस्वी झाली आहे. सध्या लँडिंगसाठी ग्राउंड रेडिओ सिग्नलची आवश्यकता असते. ही यंत्रणा महागडी असते. त्यामुळे लहान विमानतळांवर ही यंत्रण उपलब्ध नसते. दाट धुके, मुसळधार पाऊस यामुळे दृश्यमानता कमी असल्यास लँडिंग धोकादायक ठरते. मात्र, ‘गगन’ यंत्रणेमुळे आधीपासून उपलब असलेल्या जीपीएस सिग्नलमधील त्रुटी दुरुस्त करुन जास्त विमानांचे अचूक लोकेशन पाठवते. विमानांनाही जीसॅट-8 आणि जीसॅट-10 या उपग्रहांद्वारे अचूक माहिती मिळते.

























































