
पतीने त्याच्या वहिनीसोबत चॅटिंग करणे, पुतण्याचे नाव आपल्या हातावर गोंदवणे ही कौटुंबिक हिंसाचाराअंतर्गत क्रूरता होऊ शकत नाही. याचा गुन्हा वहिनीविरोधात नोंदवता येऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
एका पत्नीने पती व त्याच्या नातलगांविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा नोंदवला होता. यात पतीच्या वहिनीला आरोपी करण्यात आले होते. पती वारंवार त्याच्या वहिनीसोबत चॅटिंग करायचा. पुतण्याचे नाव त्याने हातावर गोंदवले होते. तिच्या सांगण्यावरूनच पती माझ्याशी वाद घालायचा, असा आरोप पत्नीने केला होता.
हा गुन्हा रद्द करण्यासाठी वहिनीने याचिका दाखल केली होती. न्या. रणजितसिंह भोसले यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. पत्नीने पतीच्या वहिनीवर केलेले आरोप हा कुटुंबाचा अंतर्गत वाद आहे. संशयावरून पत्नीने पतीच्या वहिनीविरोधात हा गुन्हा नोंदवला आहे, असे न्यायालयाने नमूद केले.



























































